
श्री विठ्ठल मंदिर परिसरातील केला जाणारा कॉरिडॉर रद्द करावा या मागणीसाठी बाधित कुटुंबातील महिला आक्रमक झाल्या आहेत. गुरुवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या फोटोंच्या कपाळावर आपल्या रक्ताचे तिलक लावून औक्षण केले. राखी पौर्णिमेची ओवाळणी म्हणून शासनाने कॉरिडॉर अन् डीपी प्लॅन रद्द करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शासनाने श्री विठ्ठल मंदिर परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणाचे नियोजन सुरू केले आहे. या प्रस्तावित प्रकल्पात सुमारे एक हजार कुटुंब आणि तीनशे हून अधिक व्यापारी दुकाने बाधित होत आहेत. बाधित होणाऱ्या नागरिकांनी कॉरिडॉरला तीव्र विरोध दर्शविला असून यासाठी लोक सातत्याने रस्त्यांवर उतरत आहेत. येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ओवाळणी म्हणून कॉरिडॉर रद्द केल्याची बातमी द्यावी असा आग्रह महिलांनी केला.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे डिजिटल बॅनर हातात घेऊन त्यांच्या फोटोला स्वतःच्या रक्ताचे तिलक लावून बाधित कुटुंबातील महिलांनी फोटोचे औक्षण केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेले होते.
पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कपाळी रक्ताचा तिलक; पंढरपूर कॉरिडॉर रद्द करण्यासाठी महिलांचे अनोखे आंदोलन #pandharpur pic.twitter.com/4L4hFiMnkb
— Saamana Online (@SaamanaOnline) August 7, 2025