
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस सरकारकडून होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ पंढरपुरातील शिवाजी चौकात ४०० पेक्षा जास्त तरूणांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकार सबबी पुढे करून चालढकल करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सरकारने ठरविले तर न्यायालयात सरकार भक्कमपणे आपली बाजू मांडत मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. मात्र सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळेच मराठा समाजातील तरूणांमध्ये दिवसेंदिवस सरकारविषयी असंतोष निर्माण होत आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी मुंडन आंदोलन करण्यात आले. येथील शिवाजी चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटनांच्या ४०० पेक्षा अधिक कार्यकत्यांनी सरकारचा निषेध करत मुंडन केले. त्यानंतर सरकारचे प्रतीकात्मक अंत्यविधीही त्यांनी केले. आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ९ ऑगस्टपर्यंत सरकारने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनाला आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.






























































