
माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यात्रेला येणाऱया भाविकांना अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समिती सज्ज झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, म्हणून दर्शनरांगेची उभारणी करण्यात येत आहे. पत्राशेड येथील दर्शनरांगेत चार दर्शनशेडची उभारणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटीनुसार माघ यात्रा सोहळा साजरा होत आहे. दि. 5 ते 15 फेब्रुवारी या दरम्यान यात्रा सोहळा पार पडत आहे, तर दि. 12 रोजी यात्रेचा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. त्या अनुषंगाने मंदिर समितीने यात्रेची तयारी सुरू केली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाकरिता येणाऱया भाविकांना दर्शन रांगेतून दर्शन मिळावे, म्हणून मंदिर समितीने ज्ञानेश्वर दर्शन मंडपापासून ते स्काय वॉक, स्काय वॉक ते सारडा भवन ते पुढे पत्राशेडपर्यंत दर्शन रांग उभारण्यात येत आहे. पत्राशेडमध्ये असलेल्या चार पत्राशेडपुरतेच मर्यादित चार दर्शन शेड उभारले जात आहेत, तर दर्शन शेडच्या पुढे रिद्दीसिध्दी मंदिरापर्यंत उभारण्यात येणार आहे. दर्शन रांग व शेड उभारणीचे काम मंगळवारअखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.
उभारण्यात येणारी दर्शन रांग वॉटरप्रूफ असणार आहे. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस यापासून भाविकांचे संरक्षण होणार आहे. त्याचबरोबर या दर्शन रांगेत पिण्याचे शुध्द पाणी, भाविकांना नाश्ता, चहा पुरविण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे दर्शन रांगेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पोलीस बंदोबस्तही राहणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
दरम्यान, माघ वारीच्या निमित्ताने छोटय़ा-मोठय़ा दिंडय़ा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. पंढरीत भाविकांची संख्याही वाढू लागली आहे, तर नगरपालिका आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, विद्युत पुरवठा विभागही कामाला लागला आहे.
चंद्रभागा वाळवंटात स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम
चंद्रभागा नदी स्वच्छता अभियान शाहू शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात आले. यावेळी माजी शिक्षणमंत्री, शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. चंद्रभागा वाळवंट व नदीकिनारी भागातील कचरा, निर्माल्य उचलण्यात आला आहे. तसेच नगरपालिकेच्या वतीने शहरात व परिसरात स्वच्छता मोहीम सुरू आहे, तर अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी चंद्रभागा वाळवंट स्वच्छता मोहीम राबवून भाविकांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येते.
माघी यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाकडून आज निर्णय होईल. तथापि माघी यात्रेबाबत प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे सुरू केले आहे. माघ शुध्द एकादशी 12 फेब्रुवारी रोजी आहे. या यात्रा कालावधीत ‘श्रीं’चे सर्व राजोपचार सुरू राहतील. वारी कालावधीत वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरेने मंदिरात होणारे सर्व कार्यक्रम शासन आदेशान्वये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जातील.
– गजानन गुरव, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी





























































