
हरी तुझे नाम गाईन अखंड |
याविण पाखंड नेंणे काही ||
अंतरी विश्वास अखंड नामाचा |
काया मने वाचा हेंचि देई||
तुका म्हणे आता देई संतसंग |
तुझे नामी रंग भरो मना ||
या पंक्तीप्रमाणे हरीचे नाम मुखी घेत, टाळ मृदंगाच्या गजरात बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे आज भक्ती भावाने पालखीचे स्वागत जुन्या परंपरेनुसार धोतराच्या पायघड्या घालून करण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण जुन्या बस थांब्यावर मोठ्या उत्साहात पार पडले. पालखी भोवती वारकऱ्यांनी रिंगण केले होतो. सुरुवातीला पालखी भोवती मेंढ्या धावल्या त्यांच्या पाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन आणि कलश डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले, आणि टाळकरी धावले. रिंगण पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबा आणि माऊलींचा नामघोष सुरू होता. यावेळी काटेवाडी, भवानीनगर, कन्हेरी पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी तुकोबारायांच्या दर्शनासाठी गर्दी केली. तुकोबांचे आशीर्वाद मिळाल्यानंतर मेंढ्यांना रोगराईचा त्रास होत नाही, अशी स्थानिक मेंढपाळांची श्रद्धा आहे. यावेळी धनगर समाजातील मेंढपाळ या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
काटेवाडी कमानीमधून दुपारी रथामधून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका खांद्यावरती घेऊन पालखी ओटा येथील विसाव्याच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या. परंपरेनुसार मान असणाऱ्या परीट समाजाच्या बाळासाहेब ननवरे, दत्तात्रय ननवरे, राजेंद्र ननवरे, संतोष ननवरे, राहुल ननवरे यांनी धोतराच्या पायघड्या घालत पालखी ओठा या ठिकाणी आणण्यात आली. या धोतराच्या पायघड्या संत गाडगे महाराजांच्या शिकवणीतून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.
बारामतीकरांचा निरोप घेत ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज इंदापूर तालुक्यात दाखल झाला. भवानीनगर मध्ये आमदार दत्तात्रय भरणे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, सणसरचे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार, सणसर चे सरपंच यशवंत नरुटे पाटील, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे, अभयसिंह निंबाळकर, रंणजीत निंबाळकर, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे इंदापूर उपतालुकाप्रमुख विजय शिरसट, करणसिंह घोलप, पांडुरंग निंबाळकर, योगेश शेलार, दिपक नेवसे, दिलीप निंबाळकर, किशोर भोईटे, दत्तू गुप्ते, भवानीनगर तलाठी उज्वला भगत, प्रशांत काटे, युवराज रणवरे, यांनी पालखीचे स्वागत केले.


























































