
पंढरपूर येथील सफाई कर्मचाऱ्यांनी मालकी हक्काची घरे, नवीन कामगार भरती, सानुग्रह अनुदान मिळावे, आरोग्य विमा उतरावा आदी विविध मागण्यांसंदर्भात दि.1 जूनपासून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता नगरपालिकेसमोर बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले. मात्र, शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी आजपासून ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने दिला आहे. ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर ‘काम बंद’ आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने केली आहेत. याची दखल घेऊन दि. 9 सप्टेंबर 2019 रोजी तत्कालीन विधान परिषद उपसभापती आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी विधान भवनात बैठक घेतलेली होती. या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाले. मात्र, त्यानंतर शासनाने अद्यापि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. आमदार प्रशांत परिचारक यांना निवेदन दिले होते. त्यांनी त्यावेळी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक झाली. पण अद्यापि कोणताही पाठपुरावा झाला नाही, म्हणून 2 मे रोजी उपायुक्त शंकर गोरे व अनिल मुळे यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. पण त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने 1 जूनपासून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले. पण शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने आजपासून या कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात काशिनाथ सोलंकी, किसन लल्लू, माधव लाला, विठ्ठल रामा, महेश गोयल, गंगाराम पुरबिया, अनिल गोयल, मदन परमार, प्रमोद वाघेला, सतीश सोलंकी, योगेश मेहडा, दाऊत वाघेला, रवि वाघेला, कांतीलाल मेहडा, कल्पेश गोयल, रमेश सोलंकी, राजू वाघेला, रोनक गोयल, अरविंद वाघेला, सुनील मेहडा, राजन गोयल यांच्यासह कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित आहेत.
सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या
– उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मैला सफाई कामगारांचे राहते घर मालकी हक्काचे व्हावे.
– शहर हद्दवाढीनुसार सफाई कामगारांची नवीन भरती व्हावी.
– प्रलंबित 66 लोकांची वारसा हक्काची प्रकरणे त्वरित समाविष्ट करून घ्यावीत.
– 10 वर्षे सेवा होण्यापूर्वी जे कर्मचारी मयत झालेत त्यांना सानुग्रह अनुदान मिळावे.
– सफाई कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदोन्नती मिळावी.
– अनुकंपाद्वारे अर्ज केलेल्या अर्जदारांना नोकरीत समाविष्ट करावे.
– कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळावा.
– सर्व कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा त्वरित उतरावा.
शिपाई कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. जर मागण्या मान्य नाही केल्या तर आंदोलन बेमुदत सुरूच ठेवू. आषाढी यात्रेमध्ये ‘काम बंद’ आंदोलन करून मुख्यमंत्री शिंदेंना घेराव घालणार
– गुरू दोडिया, सफाई कामगारनेते.



























































