नादब्रह्माचा सच्चा साधक हरपला, पं. भाई गायतोंडे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhai gaitonde tabla pandit

सामना प्रतिनिधी । ठाणे

बुजुर्ग तबलावादक पं. सुरेश (भाई) गायतोंडे यांचे गुरुवारी रात्री 11.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय 87 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी उषा, मुलगा डॉ. दिलीप आणि मुलगी उमा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गायतोंडे यांच्या निधनाने हिंदुस्थानच्या संगीत विश्वातील सच्चा साधक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोकणातून ठाणे येथे आल्यावर भाई गायतोंडे यांचे वास्तव्य खोपट परिसरातील विकास पाम सोसायटीत होते. केमिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर भाईंनी तबलावादन हेच क्षेत्र निवडले. पं. जगन्नाथबुवा पुरोहित अर्थात गुणीदास यांच्याकडे त्यांनी तबलावादनाचे धडे गिरवले. त्यानंतर तबलावादन हेच गुरुस्थानी मानून भाईंनी या क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा आणि घराण्यांचा अभ्यास करून स्वतःचा ठसा उमटवला. त्यांनी शास्त्रीय संगीतातील दिग्गजांची साथसंगत तर केलीच पण शेकडो शिष्य तबलावादनाचे विनामूल्य शिक्षण देऊन घडवले.

तबलावादनावर भाई गायतोंडे यांनी अनेक पुस्तके लिहिली. ज्येष्ठ तबलवादक पं. अहमदजान थिरकवा यांचे अखेरचे शिष्य अशी त्यांची ख्याती होती. संगीतक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2002 मध्ये संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. गेले काही दिवस प्रकृती अस्वस्थतेमुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर जवाहरबाग येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरस्कार आणि सन्मान

1992 – ताल विलास– संगीत पिठसूर-सिंगर संसद
1993 – स्वर साधन रत्न– स्वर साधना समिती, मुंबई
1993 – कोकण कला भूषण – कोकण कला अकादमी, मुंबई
1998 – नादश्री – हिंदुस्थान संगीत कलाकार मंडळी, बंगळूर
2002 – संगीत नाटक अकादमी पुरस्कार
2003 – संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली
2004 – मानद संगीताचार्य
2004 – वोकेशनल एक्सिलन्स ऍवॉर्ड
2005 – कलाश्री पुरस्कार, पुणे
2005 – संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार, पुणे
2006 – संगीत कलारत्न, आग्रा
2010 – मानपत्र – लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट
2010 – गुरू सन्मान अर्पण, लखनऊ
2010 – सवाई गंधर्व संगीत महोत्सवात सत्कार, पुणे
2011 – संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार, ठाणे