माझे जीवन गाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसावरी जोशी,[email protected]

गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘गानसरस्वती पुरस्कार’ पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. सरस्वतीने एका सच्च्या, निर्मळ आणि निखळ स्वराचे केलेले हे कौतुक आहे. ‘फुलोरा’ही संजीवजींच्या या कौतुकात पुढाकाराने सामील झाली आहे.

तसं पाहता पं. संजीव अभ्यंकरांना मी दोनदा भेटले आहे. दोन्ही वेळेला विषय अर्थातच गाणं… आताही आम्ही भेटलो. पण दूरध्वनीवरून. अनेक वर्षांनी… विषय अर्थातच गाणं… नुकताच संजीवना किशोरीताई आमोणकरांच्या स्मरणार्थ सुरू केलेला ‘गानसरस्वती पुरस्कार’ जाहीर झाला आणि आमच्या गप्पांचा योग पुन्हा जुळून आला. जवळजवळ 16-17 वर्षांनी…

तोच तलम-मुलायम आवाज… पं. जसराजांची कलात्मक गायकी दाखविणारा… बोलणेही तसेच निखळ, पारदर्शी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निगर्वी… एवढय़ा वर्षांनंतरही संजीवजींकडे माझा भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईलमध्ये नोंदवलेला होता. ‘कशी आहेस गं… बोल’. अगदी सहज… साधी… जिव्हाळा दाखवणारी सुरुवात… बोलण्यातील आणि आवाजातील माधुर्य तेच… क्षणात गप्पांसाठी वेळ मिळाला.

गानसरस्वतीचा वरदहस्त

हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी प्रत्यक्ष गानसरस्वतीचा वरदहस्त माथ्यावर मिळाल्यासारखा आहे. आमच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळींचे गाणे ऐकूनच आमच्या गाण्यात विविधता आणि ताजेपणा येतो. तसेच पं. जसराजजी माझे प्रत्यक्ष गुरू असले तरी किशोरीताई माझ्या अप्रत्यक्ष गुरूच आहेत. त्यांचा निरंतर आशीर्वाद या पुरस्काराच्या रुपाने मला मिळाला असे मी मानतो. गानसरस्वतीविषयीचा नितांत आदर संजीवजींच्या नितळ स्वरातून जाणवत होता.

प्रत्येक चित्र सुंदरच असते

शास्त्रीय गायकीची अनेक अंगं असली तरी शेवटी शास्त्रीय संगीताची मूल्यं एकच असतात. मुळात शास्त्रीय संगीत हा एक खूप विशाल कॅनव्हास आहे. त्यावर अनेक रागांचे रंग भरले जातात. पण तरीही या साऱयांचा तात्त्विक धागा एकच असतो. 12 स्वरांतच विहार करायचा असतो. फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी… सादरीकरण वेगळे… पण तरीही प्रत्येक चित्र हे सुंदरच असते. शास्त्र्ााrय गायकीची सहज सोपी व्याख्या संजीवजींनी विषद केली.

गुरुकुल म्हणजे…

त्यांच्या या उकल करण्यावरून जाणवत होते की संजीवजी उत्तम शिक्षकही आहेत. स्वतः पं. जसराजांकडे राहून गुरुकुल पद्धतीत गाण्याची संथा घेतल्यामुळे गुरुकुल पद्धतीचा त्यांना खूप अभिमान आणि आस्था आहे. त्यांच्या शिष्यांना ते गुरुकुल पद्धतीनेच शिकवतात. गुरुकुलाची फार सुंदर व्याख्या संजीवजींनी केली. त्यांच्या मते गुरुकुल म्हणजे गुरुचा सहवास जास्तीतजास्त मिळणं. गुरुने आपल्या शिष्यांना पुरेसा वेळ देणं, शिष्यांचं गाणं ऐकणं, त्यांच्या चुका सुधारणं. आज त्यांचे शिष्य जरी त्यांच्याकडे राहात नसले तरी संजीव आपल्या शिष्यांसाठी सतत उपलब्ध असतात. एखादी विद्यार्थिनी व्हॉट्सअपवर त्यांना आपल्या आवाजातील बंदीश पाठवते… आणि कधी पुण्याबाहेर असलेले संजीव ती बंदीश सुधारून, स्वतःच्या आवाजात गाऊन पुन्हा पाठवून देतात. त्यांचे शिष्य त्यांना ‘दादा’ म्हणतात… आणि त्यांचे दादा परदेशात असले तरी आपल्या शिष्यांसाठी 24/7 उपलब्ध असतात.

सुखावणारे बदल

आज शास्त्रीय संगीतात काळानुसार अनुरूप आणि सकारात्मक बदल झाले आहेत. जे खूप सुखावणारे आहेत. संजीव सांगत होते. गायक अतिशय बिनचूक आणि योग्य त्या ठिकाणी व्यावसायिकतेचे भान सांभाळतात. वेळेचे भान त्यांना आले आहे. मैफलीवर पकड पुढच्या 5-7 मिनिटांत घेण्याचे तंत्र आजच्या गायकांना अवगत झाले आहे. त्यामुळे मैफल रंगते. आम्ही श्रोत्यांना जे आवडेल ते देतो… श्रोतेही अभिरुचीसंपन्न असल्याने गुणवत्तेच्या अपेक्षेनेच गाणं ऐकायला येतात. आज शास्त्र्ााrय गायकाचेही आकर्षक, रूबाबदार राहणे, दिसणे महत्त्वाचे ठरते. पूर्वी एवढे पोषाखाकडे लक्ष जायचे नाही, पण आता मात्र दृष्टिकोन बदलला आहे.

समाजमाध्यमांच्या माध्यमातून आम्ही रसिकांशी सतत जोडलेले राहातो. तांत्रिकतेची बऱयापैकी आवड आणि समज संजीवजींच्या बोलण्यातून जाणवत होती. खूप पूर्वीपासून त्यांची सुरू असलेली वेबसाईट, यूटय़ुबवर स्वतःची गाणी, बंदिशी हे त्यांच्यातील तांत्रिक प्रगल्भताच दाखवत होते.

चित्रपटाचे संगीत समाजाचे प्रतिबिंब

आजच्या चित्रपट संगीताविषयी बोलताना संजीव म्हणाले की, चित्रपटाचे संगीत हे समाजाचे प्रतिबिंब असते. आज समाजमन जरा भडक आणि दिखाऊ गोष्टींकडे आकर्षित झाले आहे. त्यामुळे संगीतही तशाच प्रकारचे पुढे येते आहे. कोणत्याही अभिरुचीपूर्ण कलेत संयम फार महत्त्वाचा असतो. आम्ही गायक आपल्या गाण्यातून प्रेक्षकांची अभिरुची घडवत असतो. भडक गोष्टीकडे झुकलेली अभिरुची पुन्हा दर्जेदार होण्यास वेळ लागेल, पण होईल नक्की.

संजीवजींची दिनचर्या फारच लवचिक आणि वेळेप्रमाणे आणि गरजेनुसार बदलणारी आहे. त्यांचे विद्यार्थी आणि संगीत हे नेहमीच त्यांचे प्राधान्य राहिले आहे. कधीकधी संजीवजी गाण्याचा क्रिएटिव्ह ब्रेकही घेतात. अर्थात गाण्यासाठीच… गाण्यावरील मनन… चिंतनासाठी.

आवाज सांभाळण्यासाठी संजीव बोलण्याचं रेशनिंग करतात. मी खूप कमी बोलतो. हसत हसत त्यांनी सांगितलं. आत्ता तुझ्याशी खूप बोलत असलो तरीही…

सकाळ-संध्याकाळ वेळेनुसार तासभर चालणं… संपूर्ण शाकाहार… तळलेलं टाळणं… गोड पदार्थांवर मनापासून प्रेम… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदी राहणं आणि 24 तास गाण्यात रमणं ही संजीवजींच्या सोप्या, आनंदी जगण्याची व्याख्या.

गानसरस्वती पुरस्काराचे वृत्त हाती आले तेव्हा त्यात एक ओळ होती की, 50 वर्षांच्या आतील शास्त्रीय गायकाला पुरस्कार देणे ही संकल्पनेची महत्त्वाची अट. हे वाचूनच मला खूप बरे वाटले… आणि शास्त्रीय संगीताबद्दल मी अजूनच खूप जास्त आशावादी झाले. कारण कौतुक जेव्हा उमेदीच्या काळात होते तेव्हा नवे काहीतरी करण्याची उमेद वाढते. संजीव, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. गानसरस्वतीचा वरदहस्त तुम्हाला लाभला आहेच. शास्त्रीय संगीतात तुमच्या कंठातून असेच अनमोल… चिरंतन सूर निनादत राहोत…

रियाझ त्यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचा ठरतो. तो त्यांच्या मनात अखंड सुरू असतो. रियाझाची व्याख्या खूप व्यापक आहे. ‘सिखा… देखा… परखा…’. शिकणं ही प्रक्रिया काही वेळाची असते. पण रियाझ अनंत काळाचा असतो.