पंडित शिवकुमार शर्मा अनंतात विलीन, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संतूरसम्राट पंडित शिवकुमार शर्मा यांच्यावर आज विलेपार्ले येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीत आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी शिवकुमार शर्मा यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी जेव्हीपीडी- जुहू येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, गीतकार जावेद अख्तर, प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन, वादक तौफिक कुरेशी, ज्येष्ठ गायिका देवकी पंडित, इला अरुण, गायक हरिहरन, संगीतकार ललित पंडित, सिद्धार्थ काक आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवजींच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवजींनी हातात संतूर वाद्य घेतले आणि त्या वाद्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली. भविष्यात शंभर वर्षांनंतर पिंवा हजार वर्षांनंतरही जेव्हा जेव्हा संतूर वाद्याचा उल्लेख होईल, तेव्हा तो शिवजींशिवाय अपूर्ण असेल. विज्ञान आणि आईन्स्टाईनचे जे नाते आहे, तेच संतूर आणि शिवजींचे आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी श्रद्धांजली वाहिली.

संगीताला लाभलेला आशीर्वादच जणू

पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर या कश्मिरी वाद्याला वेगळी उंची आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. ते अलौकिक वादन करायचे. अगदी मन आणि आत्मा ओतून संतूर वाजवायचे. माझ्या आणि इतरांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ते संगीत खूप गाजले. संगीत क्षेत्रात इतके अतुलनीय कार्य करूनही ते विनम्र होते. शिवकुमार शर्मा आणि हरिप्रसाद चौरसिया म्हणजे संगीताला लाभलेला आशीर्वाद जणू, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली. बच्चन यांनी ब्लॉग लिहून शिवकुमार शर्मा यांच्या आठवणी जागवल्या.