खवले मांजरासाठी वन विभागाची मोहीम

>> जे. डी. पराडकर

खवले मांजर आता नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होणाऱया सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचे प्रमाण अधिक आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यांचं संरक्षण देण्यात यातील काही प्रजाती अतिधोक्याच्या यादीत आहेत. म्हणूनच महाराष्ट्र वन विभागाने याबाबत कृती आराखडा आखत मोहिम आखली आहे.

खवले मांजर गेल्या काही वर्षांत अत्यंत चर्चेत आलेला प्राणी आहे. निसर्गानं ज्याला संरक्षणासाठी खवले दिले तेच त्याच्या जीविताला धोकादायक ठरू लागले. अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडलेल्या या गरीब प्राण्याला संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. निसर्गात वाळवी आणि मुंग्या खाऊन राहणारा हा प्राणी अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक. त्याची संख्या कमी झाल्याचे दुष्परिणाम वाळवीची संख्या वाढल्याने लगेच दिसून येतात. या प्राण्याविषयी अत्यंत कमी अभ्यास झालेला असल्याने त्याचा जीवनक्रम, त्याचे पुनरुत्पादन याविषयी अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळेच त्याची संख्या पृत्रिमरीत्या वाढविण्यात खूप अडचणी आहेत. फेब्रुवारी महिन्यातील तिसऱया शनिवारी म्हणजेच 20 फेब्रुवारीला ‘जागतिक खवले मांजर दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. वन विभागाने त्यांच्या संरक्षणासाठी आता ‘पृती आराखडय़ा’सारखी विशेष मोहीम हाती घेतल्याने खवले मांजरांना जीवदान मिळेल अशी अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.

संगमेश्वरमधील एका गावात 2018 साली खवले मांजर आढळले आणि त्यानंतर खवले मांजर संरक्षण कार्यक्रम राबवणारी सह्याद्री निसर्गमित्रची टीम संगमेश्वर येथे आली आणि त्यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. सह्याद्रीची जंगलं आता अस्पर्श राहिलेली नाहीत. अगदी जंगलाच्या अंतर्भागातही मानवी अस्तित्व, गुरेचराई आणि जंगलतोड मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. चोरटय़ा शिकारीने बरेच प्राणी जवळ जवळ नामशेष करत आणले. खवले मांजर तर एकदम निरुपद्रवी. त्यामुळे तो शिकाऱयांच्या टार्गेटवर नसेल तरच नवल! रत्नागिरी जिह्याच्या विविध भागांत खवले मांजराची तस्करी चालू झाली. खवले मांजराचे खवले हे केरॅटिनने बनलेले. म्हणजेच आपल्या नखांचे आणि केसाचे मटेरियल. यात काय ते औषधी गुणधर्म असायचे? खरं तर कोकणातल्या वनवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचा गैरफायदा परजिह्यातून येणाऱया लोकांकडून उठवला जात आहे. अत्यंत किरकोळ मोबदल्यात हे व्यवहार चालत असल्याची माहिती मिळत आहे. वन विभाग आणि पोलीस यांच्याकडून सहकार्य चांगले आहे, पण यामागचे सूत्रधार कायमस्वरूपी गजाआड करणं जास्त निकडीचं.

हे सर्व कोकणात घडत असतानाच आपल्या संरक्षणासाठी खवल्याला आता देवाचा आधार मिळावा म्हणून चिपळूणमधील डुगवे गावाने गतवर्षीच्या शिमगोत्सवात या विषयाला स्थान द्यायचं ठरवलंय. या गावात खवले मांजरांचा वावर अधिक आहे. खवल्याच्या संरक्षणासाठी अख्खं गाव पुढं आलं. श्री देवी वाघजाईने खवल्याच्या संरक्षणात आपली मातृछाया खवल्यावर धरावी असं साकडंच गावकरी मंडळींनी देवीला घातलं आहे. तरीही जिह्याच्या विविध भागांत खवले मांजर तस्करीचे प्रकार घडत असून त्यातील काही मोजके प्रकार उघडकीस येतात. अशा वेळी खवले मांजरांची तस्करी होत असल्याचे पुरावे सापडतात. तीन दिवसांपूर्वी रायगड जिह्याच्या हद्दीत खवले मांजराची तस्करी करणाऱयांना पकडण्यात आले. दुर्दैवाने तस्करी करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.

चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र संस्था गेली सहा वर्षे खवले मांजर संरक्षणासाठी विशेष मोहीम राबवून गावागावांत मार्गदर्शन करत आहे. राज्यात खवले मांजरांच्या वाढत्या तस्करीला चाप लावण्यासाठी वाघ-बिबटय़ांप्रमाणेचे खवले मांजरांसाठीही स्वतंत्र नियोजन पृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्य सरकाराने हा आराखडा तयार करणाऱया तज्ञ समितीच्या नेमणुकीला मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यात खवले मांजर संरक्षणासाठी आवश्यक असणाऱया उपाययोजनांच्या निर्मितीला सुरुवात होणार असल्याची माहिती सह्याद्री निसर्गमित्रच्या भाऊ काटदरे यांनी दिली आहे.

खवले मांजरांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा अशी सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने मागणीही केली होती. कोकणसह राज्यातील खवले मांजर तस्करीचे प्रमाण वाढल्याचे चित्र गेल्या काही वर्षांतील तस्करीच्या प्रकरणांमधून समोर आले आहे. राज्यातील सर्व भागांत, खासकरून कोकण आणि विदर्भात खवले मांजरांचा अधिवास आहे. याच परिसरातून खवले मांजर तस्करीच्या बातम्या समोर येत असतात. आंतरराष्ट्रीय वन्य जीव बाजारपेठेत खवले मांजरांना मोठी मागणी असल्यामुळे राज्यातून छुप्या मार्गाने या प्राण्यांची तस्करी होते. या तस्करीला चाप लावण्याकरिता आता त्यामागील कारणे, उपाय आणि योजना अमलात आणण्यासाठी ‘पृती आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या ‘राज्य वन्य जीव मंडळा’च्या 15 व्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. कोकणातील खवले मांजर अधिवासावर संशोधनाचे काम करणाऱया ‘सह्याद्री निसर्गमित्र’ या संस्थेच्या वतीने हा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे.

राज्यातील खवले मांजर तस्करीचे वाढते प्रमाण बघता त्यावर पृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत ‘राज्य वन्य जीव मंडळा’चे सदस्य आणि ‘सह्याद्री निसर्गमित्र संस्थे’चे संस्थापक भाऊ काटदरे यांनी मांडले आहे. या पृती आराखडय़ामुळे खवले मांजर संरक्षणाच्या कामामध्ये राज्यपातळीवर सुसूत्रता येईल, असे त्यांनी सांगितले. खवले मांजर कृती आराखडा तयार करण्यासाठी एक तज्ञ समिती गठीत करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता मिळाल्याची माहिती राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्य जीव नितीन काकोडकर यांनी दिली. या समितीकडून खवले मांजरांच्या तस्करीमागील कारणे शोधून त्यासंबंधीच्या उपाययोजनांविषयीचा आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतर राज्यपातळीवर या आराखडय़ांमधील नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच हा कृती आराखडा तयार होऊन त्यामुळे खवले मांजरांना जीवदान मिळावे अशी अपेक्षा सह्याद्री निसर्गमित्र संस्थेसह निसर्गप्रेमींनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या