मुद्रा – पाणीदार गावाची गोष्ट

>> पराग पोतदार

पानी फाऊंडेशनच्या `फार्मर कपमध्ये’ सहभागी झालेल्या `धरती माता महिला शेतकरी गटाच्या’ महिलांनी एकतेच्या जोरावर स्वतच्या गावाचे चित्र पालटून दाखविले आहे. या महिलांनी एकत्र येऊन केलेल्या श्रमदानातून गावावी पाण्याची समस्या दूर झाली आहे. पाझर तलावाचं 7,000 घनमीटर खोलीकरण करून 70 लाख लिटर पाणीसाठा झाला असून आता हा तलाव वर्षभर शेतकऱयांच्या पाठीशी उभा राहणार आहे.

एकेकाळी पाण्यासाठी झगडणारे गाव अशी ओळख असणारे आणि उन्हाळ्यात टँकरसाठी रांगा लावणारे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पिंपळे खुर्द गाव आज पाणीदार झाले आहे.

सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्ताचे चित्र दिसत असले तरी अशी अनेक गावे आहेत जिथे पावसाव्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागते. पाण्याचा हा संघर्ष अद्यापही दूर झालेला नाही. ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी तर पाण्याच्या समस्येने कायमचा हवालदिल. मात्र यातही या प्रश्नाला स्त्रियांनाच सामोरे जावे लागते. घरातील वापराच्या पाण्यापासून शेतीसाठी लागणारे पाणी ही दुहेरी समस्या पेलणारी ग्रामीण स्त्री कायमच हतबल दिसते. या हतबलतेला वाट मिळाली ती फार्मर कपची आणि त्यातूनच अंमळनेर येथील पिंपळे खुर्द गावातील महिलांनी या समस्येवर उपाय शोधत गावात पाझर तलावाच्या रूपाने गंगा अवतीर्ण केली. ही किमया पानी फाऊंडेशनच्या `फार्मर कपमध्ये’ सहभागी झालेल्या `धरती माता महिला शेतकरी गटाच्या’ महिलांनी साधली आहे. फार्मर कपमधील गटशेतीने त्यांना एकतेची ताकद शिकवली आणि याच एकतेच्या जोरावर त्यांनी स्वतच्या गावाचे चित्र पालटून दाखविले आहे. त्यांनी ही सर्व कामे लोकवर्गणी, सेवा सहयोग संस्था, मारवाड विकास मंच आणि इतर स्थानिक मदत यांच्याद्वारे केली आहेत.

या महिला बचत गटामुळे अनेक महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम झाल्या असून त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तसेच या महिलांच्या कार्यामुळे गावात त्यांची प्रतिष्ठादेखील वाढली आहे आणि इतर महिलांनाही प्रेरणा मिळाली आहे. या गटाने कामाची सुरुवात नाल्यांची खोली वाढवत केली. त्यांनी पाझर तलावाचं खोलीकरण केलं. नाला खोल केल्यामुळे 13,000 घनमीटर माती काढता आली आणि 1.3 कोटी लिटर पाणीसाठा झाला. पाझर तलावाचं 7,000 घनमीटर खोलीकरण करून 70 लाख लिटर पाणीसाठा झाला. आता हा तलाव वर्षभर शेतकऱयांच्या पाठीशी उभा राहणार आहे.

या कामामुळे गावातदेखील बदल घडून येणार असून रब्बी हंगामात शेवटच्या टप्प्यात सुकणारी पिकं आता वाचणार आहेत. पावसाचं प्रमाण कमी असूनही साठवलेलं पाणी शेतीसाठी पुरेसं ठरणार आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारा टँकरचा प्रश्न आता संपला आहे. विहिरींची पातळी वाढली असून शेतकरी आत्मविश्वासाने पुढच्या हंगामाचं नियोजन करत आहेत.

या गटाची पुढची दिशा वृक्ष लागवड असून महिलांनी `बिहार पॅटर्न’नुसार पाझर तलावालगत 1,000 झाडं लावली आहेत. बांधावर फळझाडं लावण्याचे नियोजन सुरू आहे. पिंपळे खुर्दच्या महिलांनी सिद्ध केलंय की, महिलांनी ठरविले तर त्या घरचं काय गावाचंही भवितव्य बदलू शकतील.

याविषयी गावकरी भैय्या पाटील म्हणाले, “आधी आम्ही विरोध केला होता. या महिला काय करू शकतील पाण्याच्या प्रश्नावर? पण आज आनंद वाटतोय, त्यांनी खरंच करून दाखवलं.”

याविषयी शीला पाटील म्हणाल्या, “गटात यायचं ठरवलं तेव्हा घरच्यांनी नाही म्हटलं होतं, पण या महिला माझं कुटुंब बनल्या. आम्ही केलेलं काम पाहून घरच्यांचं मतसुद्धा बदललं. हे काम आम्ही एकत्र आलो म्हणून शक्य झालं. वर्गणी मागायला गेलो तेव्हा विरोध करणारे लोक आज म्हणतात, गावाला जे जमलं नाही ते महिलांनी करून दाखवलं!”