
पाणीपुरी हा तसा सर्वांचा आवडता पदार्थ. ठेल्यावरील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करून पाणीपुरीची चव चाखणे आरोग्याशी खेळ ठरू शकते, याचे कारण नुकतेच सातपूरच्या एका परप्रांतीय विक्रेत्याला सडलेले बटाटे, रंगमिश्रीत चटणी वापरून पाणीपुरी तयार करताना रंगेहाथ पकडण्यात आले. महापालिकेने त्याच्यावर कारवाई करीत अस्वच्छतेप्रकरणी पाच हजारांचा दंड वसूल केला.
नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाने नुकतेच सर्वेक्षण मोहिमेंतर्गत बजरंगनगरच्या मळे परिसरात पाहणी केली. अधिकाऱ्यांकडून प्लॅस्टिक तपासणी सुरू असताना दिवाण सिंग या पाणीपुरी विक्रेत्याकडे निकृष्ट दर्जाचे साहित्य आढळले. सडलेले बटाटे, रंगमिश्रीत चटणी, उघड्यावर पडलेल्या पुऱ्यांचा ढिग, प्रचंड अस्वच्छता असल्याने त्याच्याकडील सर्व साहित्य महापालिकेच्या पथकाने नष्ट केले. सडलेले बटाटे, चटणीचा रंग जप्त केले. अस्वच्छतेप्रकरणी त्याच्याकडून पाच हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष ठेवून ठिकठिकाणच्या खाद्यपदार्थांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




























































