आंधळेपणाने व्हॉटसअॅप मेसेज फॉरवर्ड करता ? मग ही बातमी वाचायलाच पाहीजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

अमुक तमुक हरवला आहे सापडल्यास या नंबरवर कॉल करा, अमक्याचा अॅक्सिडेंट झाला आहे तातडीने रक्त हवं आहे… या क्रमांकावर संपर्क करा. असा मेसेज व्हॉटसअॅपवर आला की साहजिकच आपल्यातील माणुसकी जागी होते, मदत करू शकत नाही तर किमान मेसेज फॉरवर्ड तर करू या भावनेने आपण ते मेसेज शक्य तितक्या ग्रुपवर पाठवून मोकळे होतो मात्र याचा गंभीर परिणाम काय होऊ शकतो हे या बातमीतून कळू शकेल

बंगळुरू शहरातील प्रशांत सांबर्गी नावाच्या एका उद्योगपतीला व्हॉटसअॅरवर मेसेज आला की एका मुलाला डोक्याला गंभीर मार लागला असून त्याला रुग्णालयात भरती केलं आहे. या मुलाचे पालक कोण आहेत माहिती नाही, हा मेसेज इतका व्हायरल करा की मुलाचे आईवडील सापडले पाहीजेत. मेसेज वाचून प्रशांत हादरलेच कारण फोटोतला मुलगा त्यांचा भाचा होता. प्रशांत यांनी तातडीने मेसेज या मुलाच्या आईला म्हणजेच प्रशांत यांच्या बहिणीला पाठवला. मेजेस बघितल्यानंतर या मुलाची आई रडायलाच लागली. तिला आठवलं की रोजच्या प्रमाणे तिच्या मुलाचा शाळेत पोहोचल्याचा मेसेज आलेला नाही, यामुळे ती जास्तच घाबरली तिने तिच्या नवऱ्याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला.

मुलाच्या घरी रडारड सुरू असताना प्रशांत यांनी मेसेज पाठवणाऱ्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ज्यांना ज्यांना त्यांनी फोन फिरवला त्यांनी आपण मेसेज फॉरवर्ड केल्याचं सांगत ‘याने’ पाठवला असं सांगत दुसऱ्याकडे बोट दाखवायला सुरूवात केली. असं करत करत प्रशांत यांनी मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला शोधून काढला. त्याला या मेसेज बाबत विचारलं असता त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून प्रशांत यांना त्या व्यक्तीला झोडून काढावसं वाटलं. या व्यक्तीने त्यांना सांगितलं की त्याने नवा मोबाईल घेतलाय आणि व्हॉटसअॅप व्यवस्थित चालतंय की नाही हे पाहण्यासाठी असाच कुठला तरी जुना मेसेज फॉरवर्ड केला.

इकडे मुलाच्या आईवडीलांनी शाळेत धाव घेत मुलाची चौकशी करायला सुरुवात केली असता, मुलगा सुरक्षित असल्याचं त्यांना कळालं. रडारड करत आलेल्या या पालकांमुळे शाळेची मुख्याध्यापिका त्यांच्यावर भडकली होती. या प्रकारानंतर तज्ञांनी आवाहन केलंय ती इतर कोणाला असा मानसिक त्रास होऊ नये यासाठी मेसेजची खातरजमा करून घ्यावी. मेसेजमध्ये नंबर दिला असल्यास त्यावर फोन करून खात्री करावी, मेसेज चुकीचा असल्यास तो पाठवणाऱ्याला खरी माहिती देऊन मेसेज पाठवणाऱ्याला नवा मेसेज पाठवण्यास सांगावे.