
एका क्षुल्लक कारणासाठी एका विद्यार्थ्याचे कपडे काढून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पानिपत येथील एका खासगी शाळेत घडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांवर, त्यांच्या पत्नी आणि महिला स्वागतकारावर विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेतील पीडित हा 14 वर्षांचा मुलगा असून तो या शाळेत सातवीत शिकतो. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 3 दरम्यान या शाळेतील शौचालयातील कमोड सीट तुटल्याने या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक, त्यांची पत्नी आणि महिला रिसेप्शनिस्टने मारहाण केली.
त्याचे कपडे काढण्यात आले. जातिवाचक शिवीगाळ करून त्याला मारहाण करण्यात आली. तसंच, विद्यार्थ्याच्या गुप्तांगात पेन खुपसण्यात आलं, असा आरोप विद्यार्थ्याच्या पालकांनी केला आहे.
या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबाला शाळेतून त्याची प्रकृती बिघडल्याचा फोन आला. कुटुंबाने विद्यार्थ्याला घरी आणल्यानंतर त्याने घडलेली घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबाने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.



























































