
सामना प्रतिनिधी । हिंगोली
काँग्रेसच्या नेत्याच्या बुध्दीची कीव येते, त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. राजद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा काँग्रेसकडुन केली जात असुन समाजात व जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम या माध्यमातुन होत आहे. जातीपेक्षा या देशाची माती महत्वाची आहे. यासाठी काँग्रेसला पराभुत करुन देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी हिंगोलीतील शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांना विजयी करा, असे आवाहन भाजपा नेत्या तथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी हिंगोली येथील हजारोंच्या उपस्थितीतील अतिभव्य जाहीर सभेत केले. हिंगोली शहरातील गांधी चौकात शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ अतिभव्य जाहीर सभा घेण्यात आली. भर उन्हात तब्बल २० हजाराच्यावर नागरिक व महिला या सभेला उपस्थित होते.
याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील व प्रमुख वक्त्या म्हणून ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह पालकमंत्री दिलीप कांबळे, शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, उमेदवार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत बोलतांना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सत्तेच्या माध्यमातून हिंगोली शहर व जिल्ह्यात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तर उमेदवार हेमंत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यावर हल्लाबोल चढवत मला झाडू मारणारा कार्यकर्ता म्हणुन ते टीका करत असुन मला याचे वाईट वाटत नाही. वानखेडे यांनी शिवसेना सोडली त्या दिवशीच त्यांचा कचरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियानाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी हा झाडू मारणारा कार्यकर्ता काँग्रेसच्या वानखेडेचा कचरा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा टोला लगावला.
यावेळी मार्गदर्शन करतांना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षातुन पुढे जाण्याची शिकवण दिली असून हा त्यांच्या रक्तातील गुण आहे. आमचे बंधु जेव्हा आमच्यासोबत होते आणि ते राजकारणात आल्यावर आमची सत्ता गेली. आमच्यातून ते राष्ट्रवादीत गेल्यावर राष्ट्रवादीची सत्ता जाऊन आमची सत्ता आली, शेवटी हा पायगुण आहे असा टोला धनंजय मुंडे यांना लगावुन पंकजा मुंडे म्हणाल्या की, मोदींना हरविण्यासाठी साप आणि मुंगूस एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्यासाठी माझे बंधु हेमंत पाटील यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.






























































