
आसावरी जोशी,[email protected]
बिबटय़ा… अतिशय लाजाळू, माणसाला घाबरणारा वन्यजीव. पण अन्न–पाण्याच्या, निवाऱयाच्या शोधार्थ चुकून मानवी वस्तीत शिरून राक्षसी मानवी ताकदीला बळी पडतो आहे. काय करता येईल माणूस आणि बिबटय़ा यांचे संबंध सुधारण्यासाठी…
विविध वृत्तपत्रांचे बिबटय़ाविषयी बातम्यांचे मथळे. काय दर्शवतात हे? माणूस व वन्यजीवांमधला संघर्ष. हे सर्व मथळे बिबटय़ाविषयी सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करणारे, किंबहुना विनाकारण दहशतीतून या निष्पाप वन्यजीवांबद्दल माणसाच्या मनात तिरस्कार उत्पन्न करणारे. या वृत्तपत्रीय व्यवस्थेचाच मी एक भाग असल्यामुळे वृत्तपत्रांवर कोणत्याही परिस्थितीत तारतम्य बाळगण्याची जबाबदारी कशी असते ते पूर्णतः माहीत, पण हे मथळे वाचून वाटते की, या जबाबदार चौथ्या स्तंभानेच पर्यावरण, वन्यजीवांबद्दल हे तारतम्य सोडले तर कसे होणार?
ना घर का, ना घाट का अशी अवस्था वाटय़ाला आलेला एकमेव वन्यजीव म्हणजे बिबटय़ा. याचे कुटुंब वाघ-सिंहाचे, रुबाबही वाघाचाच, अरण्यात व्याघ्र वर्चस्वामुळे बाहेर फेकला गेलेला आणि अरण्याबाहेर त्याच्याबद्दल केवळ गैरसमजाचे जाळे, पण त्याची जगण्याची, टिपून राहण्याची ऊर्मी अत्यंत चिवट, मांजरासारखीच दुर्दम्य. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत, हवामानात तग धरून टिपून राहिलेला. अत्यंत लाजाळू, सभ्य आणि भिडस्त ही विशेषणे बिबटय़ाला अचूक लागू पडतात. अरण्यावरील मानवी वर्चस्व, सातत्याने होणारी आक्रमणे, त्यातून निर्माण होणारा भक्ष्याचा तुटवडा…
माणसासकट कोणत्याही प्राण्याचा पहिला शोध म्हणजे अन्न. या अन्नाच्या शोधात माणूस जगाच्या पाठीवर पोहोचतो, पण जेव्हा अरण्यावरील मानवी अतिक्रमणामुळे बिबटय़ा त्याचे अन्न अरण्याबाहेर शोधू लागतो तेव्हा त्याच्यावर रक्तपिपासू, नरभक्षक असण्याचा शिक्का सहज बसतो. आज एकंदर परिस्थिती पाहता माणसांना बिबटय़ांपासून नव्हे, तर बिबटय़ाला क्रूर आणि कांगावखोर माणसांपासून वाचवण्याची खरोखर गरज आहे.
अतिशय लाजाळू, भिडस्त स्वभावाचा हा प्राणी जैव साखळीतील खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याचं अरण्यात सुरक्षित असणं हे अरण्य सुदृढ असण्याचे लक्षण आहे. उत्तराखंड, आसाम, हिमाचल प्रदेश याप्रमाणे महाराष्ट्रातही माणूस आणि बिबटय़ा यांचा संघर्ष ही खूप गंभीर बाब झाली आहे. अशा प्रकारे वन्य प्राणी नष्ट करून, अरण्यं उद्ध्वस्त करून आपण माणसं स्वतःच्या निकोप जगण्यावरच घाला घालत आहोत हे प्रत्येक माणसाने लक्षात घ्यायला हवे.
बिबटय़ा अरण्यात झाडा-पानांमागे लपून माणसांपासून लांब राहणारा, पण परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी. बिबटय़ाचे भक्ष्य माणूस कधीच नसते. इतर प्राण्यांप्रमाणे तोही माणसाला अतिशय घाबरतो. संरक्षित वनक्षेत्राच्या हद्दीलगत असलेली मनुष्यवस्ती, वनक्षेत्राचे थोडेफार असलेले कायदेही फाटय़ावर मारून अरण्यापर्यंत वाढवत नेलेल्या मानवी वसाहती याचा दूरगामी परिणाम बिबटय़ाच्या राहणीमानावर झालेला आहे. यातूनच मग उच्चभ्रू मानवी वस्तीत बिबटय़ा दिसला किंवा शिरला की स्वतःला सुशिक्षित, सज्ञान म्हणवणारी माणसं थेट त्याच्या जीवावरच उठतात. त्याच्या मूळ क्षेत्रापासून त्याला जबरदस्तीने दूर नेऊन सोडल्यास तो गांगरतो व आक्रमक बनतो. बिबटय़ाने मनुष्यहानी केल्याच्या नोंदी अभावानेच आढळतात.
झपाटय़ाने कमी होणारी अरण्ये, त्यावरची भयंकर मानवी अतिक्रमणं यामुळे भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात बिबटे संरक्षित वनक्षेत्राच्या हद्दीतील मानवी वस्तीत प्रवेश करतात. शेतशिवारात आश्रय घेतात. पाण्याच्या शोधात बिबटय़ाची पिलं विहिरीत पडून जखमी होतात. लहानखुरी, भरीव चण असल्यामुळे बिबटय़ा मोठी शिकार करू शकत नाही. वेळ पडली तर तो कीटकही खातो. कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेणं हे त्याचं मोठं वैशिष्टय़. जेव्हा अरण्यात शिकार मिळत नाही तेव्हा तो मानवी वस्तीतील कोंबडय़ा, वासरं, कुत्रे खाण्याचा प्रयत्न करतो. त्याची अन्नसाखळी खूप मोठी आहे.
नाशिकमध्ये उच्चभ्रू वस्तीत बिबटय़ाचा थरार, बिथरलेल्या बिबटय़ाच्या हल्ल्यात चौघे जखमी
लखनौच्या गजबजलेल्या वस्तीत बिबटय़ा शिरला आणि लाठय़ाकाठय़ा घेऊन येणारे लोक पाहताच बिबटय़ा जीवाच्या आकांताने धावत सुटला
गोरेगावातील आरे वसाहतीत बिबटय़ा दिसला, दहशतीचे वातावरण
प. बंगालमध्ये अडीच-तीन हजार माणसांनी बिबटय़ाला ठेचून मारलं
अरण्याजवळील गावात पहाटेच्या सुमारास गोठय़ात बांधलेल्या वासरावर बिबटय़ाचा हल्ला
काय करता येईल?
बिबटय़ांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने ठोस पावले आणि सक्षम, कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम अरण्याजवळ मानवी वसाहत उभारण्याबाबत कायदा अत्यंत कठोर करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राबाहेर राजस्थानातील जयपूरसारख्या भागातील लोकांनी बिबटय़ांना सहज स्वीकारले आहे. तेथे गावातील वाटांवर, मंदिरांत बिबटे सहज नजरेस पडतात. त्याचा कोणताही ताण गावकऱयांवर येत नाही. त्यामुळे रक्तरंजित संघर्ष होत नाही.
दुर्दैवाने महाराष्ट्रात, मुंबई-पुण्यासारख्या शहरात बिबटय़ा हा दहशतीचा, भीतीचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घेराव घालून अद्दल घडविण्याचा विषय आहे.
नागरिकांमध्ये जागरुकता आणणं, बिबटय़ा आणि माणूस संबंध सुधारणं, त्यासाठी उपाययोजना करणं हे वन विभागाचे काम आहे.
राजस्थानातील बऱयाच गावांमधून वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी छोटी कुंड केली आहेत. बऱयापैकी निर्भयपणे प्राणी तेथे फिरतात. वावरतात. हे दृष्य महाराष्ट्रात कधी दिसू शकेल?























































