तेजसमध्ये झोलझाल एक्सप्रेस; जेवणाचे बिल नको असल्यास मिळते सूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

डिस्काउंट कोणाला नको असतं? पैसे वाचवण्यासाठी सगळेच धडपडत असतात. पण, तेजस एक्सप्रेसमध्ये जेवणाच्या बिलाचे पैसे हडप करण्यासाठी प्रवाशांना डिस्काउंटचं आमिष दाखवलं जात असल्याचं उघड झालं आहे.

अभिनेता आणि शेफ असलेले पराग कान्हेरे यांनीच ही पोलखोल केली आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, 16 जानेवारी रोजी कान्हेरे हे तेजसमधून करमाळी ते पनवेल असा प्रवास करत होते. जेवणाची वेळ झाल्यानंतर त्यांनी रेल्वेच्या खानपान विभागातून मांसाहारी भोजन मागवलं. त्याची किंमत 294 रुपये इतकी होती. कान्हेरे यांनी आपल्याकडील 500 रुपयांची नोट रेल्वेच्या कोच अटेन्डंट दिली आणि येताना सोबत बिल आणण्यास सांगितलं. कोच अटेन्डंटने कान्हेरे यांना बिल मागितलं नाही तर तुम्हाला 44 रुपये सूट मिळेल, असं सांगण्यात आलं.

कान्हेरे यांनी रेल्वेच्या पँट्रीत जाऊन पुन्हा या गोष्टीची खात्री केली. मात्र, त्यांनी यावेळी या प्रकाराचं गपचूप चित्रीकरण केलं. पँट्रीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही जर तुम्ही बिल मागितलं नाही तर तुम्हाला खानपान सेवा स्वस्तात मिळू शकेल आणि त्याखेरीज चहा/कॉफी मोफत अशी ऑफर देऊ केली. रेल्वे खानपान सेवेतील कर्मचाऱ्यांना पुरेसा पगार नसल्याचं कारणही कर्मचाऱ्यांनी कान्हेरे यांना सांगितलं. त्यावर कान्हेरे यांनी कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थांच्या किमतीविषयी विचारलं. त्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांना काहीही उत्तर दिलं नाही. इतकंच नव्हे तर, खानपान विभागातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशातही तफावत असल्याचं कान्हेरेंच्या लक्षात आलं. त्यांनी त्यावरही खुलासा मागितला. तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर कान्हेरे यांनी आयआरसीटीसीला इमेल पाठवून तक्रार नोंदवली. त्यानंतर आणखी एक धक्कादायक गोष्ट घडली. या इमेलनंतर काही वेळाने त्यांना तेजस एक्प्रेसच्या खानपान विभागाच्या व्यवस्थापकाकडून फोन आला. त्याने कान्हेरेंना तक्रार मागे घ्या किंवा जो गोंधळ झाला आहे तो दूर करू असं म्हणत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला.या व्यवस्थापकाने कान्हेरे यांचा पत्ताही मागितला. तेव्हा प्रवाशांच्या माहितीच्या गुप्ततेतही बराच निष्काळजीपणा होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे या प्रकाराबद्दल तक्रार केली असून हा प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबत खेळ असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, आयआरसीटीसीचे प्रवक्ते पिनाकिन मोरावाला यांना या प्रकाराविषयी चौकशी सुरू झाली असून संबंधितांवर कडक कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. यापुढेही असे गैरप्रकार होताना आढळले तर त्वरित कारवाई व्हावी यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहिती मोरावाला यांनी दिली.