पनवेलमध्ये एटीएम ऑपरेटरचाच 1 कोटी 90 लाखांवर डल्ला

एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ऑपरेटरनेच 1 कोटी 90 लाखांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. धनराज भोईर असे या ऑपरेटरचे नाव असून तो हिताची कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीत कार्यरत आहे. कळंबोली, कामोठे आणि खारघर परिसरातील एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी धनराजकडे आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांच्या व्यवहारात पैशांची तफावत निर्माण झाल्याने शोध घेतला असता ऑपरेटरनेच पैशाचा अपहार केल्याचे समोर आले.

धनराज भोईरकडे जबाबदारी असल्याने तो दररोज कामोठे, कळंबोली व खारघरमधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जात होता. मात्र पैसे भरताना सर्व रक्कम एटीएम मशीनमध्ये जमा न करता तो काही रक्कम स्वतःकडे ठेवत होता. दरम्यान वेगवेगळ्या बँकांकडून एटीएमच्या पैशांमध्ये तफावत निर्माण होत असल्याची तक्रार मिळताच हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनीने शोध घेतला असता ऑपरेटर धनराज हाच चोरटा असल्याचे उघड झाले. त्याने 26 फेब्रुवारी ते 30 जून या कालावधीत तब्बल 1 कोटी 90 लाख 49 हजार रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट होताच कंपनीने त्याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी धनराजला अटक केली असून त्याने या पैशांचे काय केले याचा शोध सुरू केला आहे.

चोरटा गजाआड
ठाणे : महिलेच्या खांद्यावरील बॅग हिसकावून पोबारा केलेल्या चोरट्याच्या कळवा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मुसक्या आवळल्या आहेत. हरी ठाकूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी आठ गुन्ह्यांची उकल केली आहे. कळव्यातील मनीषानगर परिसरात राहणाऱ्या विजया राठोड या महिला इमारतीतून उतरत असताना हरीने त्यांच्या खांद्यावरील बॅग लांबवली होती. याप्रकरणी कळवा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेऊन हरीला अटक केली.

महिलेची फसवणूक
खारघर : क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. शिल्पा शेट्टी असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून भामट्याने तिला 1 लाख गुंतवल्यास तीन लाख मोबदला मिळत असल्याचे भासवून तब्बल 21 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी खारघर पोलिसांनी सुधाकर मगविराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.