
एक लाख गुंतवल्यास दरमहा दहा हजार रुपये व्याज मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला मुरुड पोलिसांनी अटक केली आहेत. प्रसन्न पुलेकर असे भामट्याचे नाव असून त्याने आतापर्यंत शेकडो गुंतवणूदारांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून फरार होता. मात्र तो मुरुडच्या दिवाणी न्यायालयात एका प्रकरणाच्या तारखेला हजर झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या.
प्रसन्न पुलेकर याने जवळपास 136 जणांना जास्त व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यानंतर त्याने व्याजाची रक्कम दिलीच नाही. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुख्य तक्रारदार महेश भगत यांच्यासह 136 जणांनी पुलेकर विरोधात तक्रार दाखल केली. या सर्व तक्रारदारांना पुलेकरने तब्बल आठ कोटी एक लाख 25 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड होताच मुरुड पोलिसांनी पुलेकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान पुलेकर मुरुड न्यायालयात एका खटल्याच्या तारखेला हजर झाल्याची माहिती मुरुड पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी मुरुड पोलिसांनी पुलेकरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याने आणखी किती लोकांना गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
नराधमांना बेड्या
कर्जत – इन्स्टाग्रामवर तरुणासोबत मैत्री करणे एका अल्पवयीन मुलीला चांगलेच महागात पडले आहे. नराधमाने मुलीसोबत ओळख करून तिला भेटण्यासाठी एका निर्जनस्थळी बोलवले आणि संधी साधत तिच्यावर अतिप्रसंग केला. धक्कादायक म्हणजे त्याने पीडित मुलीचा व्हिडीओही तयार केला. दरम्यान तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्या मित्रानेही तिच्यावर अत्याचार केला. अखेर अत्याचाराला कंटाळून पीडितेने नेरळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन नराधमांना बेड्या ठोकल्या.
महिलेची फसवणूक
पनवेल – एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हातातील एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. वंदना कुलाळ असे महिलेचे नाव असून त्या कळंबोली परिसरात राहतात. त्या मुलीच्या फीसाठी लागणारे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्या असता भामट्याने त्यांच्या हातातील कार्डची अदलाबदली करत पिनकोडची माहिती मिळवली. त्यानंतर वंदना यांच्या बँक खात्यातून 4 हजार रुपये काढले. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.