
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ मानल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेचे जाळे आणखी विस्तारणार आहे. वर्षाखेरीपर्यंत पनवेल ते कर्जत स्थानकांदरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग खुला होऊन या मार्गावर लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या (एमयूटीपी) तिसऱ्या टप्प्याअंतर्गत 29.6 किमी लांबीच्या या मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये मार्ग सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
नवीन पनवेल-कर्जत उपनगरी मार्गावरील स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. त्याचबरोबर प्रकल्पांतर्गत बोगदे, पूल तसेच रुळाच्या कामांना प्रचंड गती देण्यात आली आहे. मुंबई महानगरात उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ अर्थात एमआरव्हीसीकडून 2782 कोटी रुपयांचा हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पाचे 85 टक्के काम पूर्ण झाले असून जून किंवा जुलै 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कामाला गती दिली आहे, असे एमआरव्हीसीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. हा नवीन उपनगरी रेल्वे मार्ग पनवेल आणि कर्जतशी पनवेल, चिखले, पोयंजे महोपे, चौक आणि कर्जत या पाच स्थानकांद्वारे जोडणार आहे. या मार्गीकेमुळे कर्जत परिसरातील प्रवाशांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकातील गर्दीचा ताण कमी होणार आहे
नव्या मार्गीकेच्या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेला 2.639 किमी लांबीचा वावरी बोगदा हा या प्रकल्पातील प्रमुख अभियांत्रिकी वैशिष्ट्य मानला जात आहे. हा बोगदा पारसिक बोगद्याला मागे टाकून मुंबईतील सर्वात लांब उपनगरीय रेल्वे बोगदा बनणार आहे. या मार्गावर नाधल – 234 मीटर, किरावली- 333 मीटर आणि वावरी- 2639 मीटर असे तीन बोगदे आहेत.






























































