
म्हसळा तालुक्यातील भेकऱ्याचा कोंड येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या भ्रष्टाचाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भंडाफोड केला. 6 कोटी 40 लाख रुपये खर्चुन होणारे हे काम कसे निकृष्ट दर्जाचे आहे याचा पंचनामाच शिवसेनेचे म्हसळा शहरप्रमुख विशाल सायकर यांनी केला. तरीही गेंड्याच्या कातडीचे प्रशासन बधत नसल्याने सायकर यांनी बेमुदत उपोषण करताच अधिकाऱ्यांची पळापळ झाली आणि त्यांनी भेकऱ्याचा कोंडमधील रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व नवी मोरी (पूल) बनवण्याचे मान्य केले.
म्हसळ्याजवळील भेकऱ्याचा कोंड या गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवे रस्ते बनवण्यासाठी 6 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले. मात्र हा रस्ता बनवताना ठेकेदाराने या रस्ते कामात रेती वापरण्याऐवजी ग्रीट वापरले. त्यामुळे रस्त्याचे काम अत्यंत तकलादू झाले आणि मोऱ्याही निकृष्ट दर्जाच्या होऊन त्या फुटून गेल्या. याची गंभीर दखल म्हसळा शिवसेना शहरप्रमुख विशाल सायकर यांनी घेतली आणि त्यांनी तातडीने ग्रामसडक योजनेच्या अधिकारी सारिका देसाई यांच्याशी संपर्क साधला.
अधिकाऱ्यांना विचारला जाब
दरम्यान, शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी ग्रामसडक योजनेच्या अधिकारी सारिका देसाई, अभियंता गुगलकर यांना दूरध्वनीवरून जाब विचारला. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असेल तर ते तुम्हाला पुन्हा करून द्यावे लागेल, असे नागेंद्र राठोड यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सायकर यांच्या आंदोल नाची दखल घेऊन 7 जुलै रोजी पुन्हा एकदा रस्त्याची पाहणी झाली आणि या पाहणीत रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले व या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व मोऱ्या बनवून देऊ, अशी कबुली ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.