पनवेल–ठाणे मार्गावर गारेगार प्रवास, मध्य रेल्वेची एसी लोकल 30 जानेवारीपासून धावणार

1298
ac-local-train

मध्य रेल्वेच्या बहुप्रतीक्षित वातानुकूलित लोकलला मुहूर्त मिळाला असून 30 जानेवारी रोजी पनवेल ते ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंघडी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलचे डिसेंबरला चेन्नईतून आगमन झाल्यानंतर तिला चालवण्यासाठी ट्रान्सहार्बर मार्गाची निवड करण्यात आली. या मार्गावर फारसी गर्दी नसल्याने येथे एसी लोकलची निवडल्याचे रेल्वे अधिकाऱयांचे म्हणणे आहे. परंतु एसी लोकलमुळे या मार्गावरील साध्या लोकलच्या तितक्याच फेऱयांना सर्वसामान्य प्रवाशांना मुकावे लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच या वातानुकूलित लोकलचे भाडे अधिक असल्यामुळे या लोकलला किती प्रतिसाद मिळतो याबद्दल खुद्द रेल्वेचे अधिकारी साशंक आहेत.

सीएसएमटी स्थानकातून हिरवा झेंडा

पनवेल ते ठाणे या स्थानकांदरम्यान एसी लोकलची उद्घाटनीय फेरी होणार असून ठाणे स्थानकानंतर नेरूळहून ही गाडी पुन्हा यार्डात रवाना होणार आहे. त्यानंतर 31 जानेवारीपासून ट्रान्सहार्बरच्या वेळापत्रकात ही गाडी समाविष्ट होणार आहे. दुपारी 2.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या