कर्जमाफी घोटाळा आरोपवर रितेश देशमुखचं तडख उत्तर, नेटकऱ्यांकडून कौतुक

riteish-deshmukh-1

अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीचा फायदा उचलल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या मधु पौर्णिमा किश्वर यांनी केला होता. मात्र आपल्याकडील माहिती चुकीची असून आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत रितेशेने सोशल मीडियावरूनच आरोप फेटाळून लावले.

सामाजिक कार्याकर्त्या, लेखिका आणि प्राध्यापिका अशी ओळख असलेल्या मधु पौर्णिमा किश्वर यांनी रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांच्यावर कर्जमाफीचा फायदा उचलल्याचा गंभीर आरोप केला होता. सोमवारी त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून रितेश आणि अमित यांना टॅग करत एक फोटो ट्वीट केला होता. यामध्ये कर्जमाफीसंदर्भाती कागद दिसत असून रितेश आणि अमित देशमुख यांची नावं दिसत आहेत. त्यांनी आरोप केला आहे की, 4 कोटी 70 लाख रुपये देशमुख बंधुंना कर्जमाफीच्या रुपाने मिळाले आहेत.

‘अभिनेता रितेश देशमुख आणि आमदार अमित देशमुख (काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र) शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेत असून यामध्ये 4 कोटी 70 लाख रुपये गुंतले आहेत’, असा आरोप मधु पौर्णिमा किश्वर यांनी ट्विटरवरून केला होता. मात्र हा आरोप रितेश देशमुखने फेटाळून लावला आहे.

‘मधु किश्वरजी आपल्यापर्यंत पोहोचलेला कागद हा खरा नसून बदनामी करण्याच्या उद्देशाने कुणीतरी त्यात बदल केले आहेत. आपण ट्वीटमध्ये नमूद केल्याप्रमाणे मी किंवा माझ्याभावाने कोणतेही कर्ज घेतलेले नाही. त्यामुळे कर्जमाफीचा प्रश्नच उद्भवत नाही. कृपया आपली दिशाभूल करून घेऊ नका. धन्यवाद’, असा नम्रपण स्पष्ट शब्दात रितेशनं त्यांना उत्तर देत आरोप फेटाळून लावले आहे.

रितेशनं तडख दिलेल्या उत्तरानं नेटकरी आणि त्याचे चाहते खूश आहेत. देशमुख कुटुंबाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे कागदपत्र मुद्दाम पसरवले जात असल्याचेही अनेकांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या