
पुणे, मुंबई जिल्ह्यासह इतर जिल्हयात नोकरी निमित्त गेलेले शेकडो लोक परत आप-आपल्या गावात परत येत आहेत. अश्या परिस्थितीत जिल्हयात ‘कोरोना’ विषाणूची लागण होऊ नये म्हणून जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश आज दिले. ही सीमा बंदी 31 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.
राज्य शासनाने शासनाने ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधत्मक कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनामध्ये जिल्हा सीमा बंदी हा देखील निर्णय सोमवार, 23 मार्च जिल्हाधिकार्यांनी घेतला आहे. परभणी जिल्ह्यातील नागरिक बाहेर जिल्ह्यात प्रवास करीत आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातील नागरीकही परभणी जिल्ह्यात येत आहेत. बाहेर जिल्ह्यातून येणारे नागरिक, प्रवाशी यांच्या मार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या करिता जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. या साठी परभणी जिल्ह्यातील सर्व सीमा तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास अत्यावश्यक कारण वगळता बाहेर जिल्ह्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिक नसलेल्या कोणत्याही जिल्ह्यात अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे-मुंबई व इतर महानगरातून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, असे ही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.
कापुस, तुर खरेदी केंद्र राहणार बंद
‘कोरोना’ विषाणुला प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील कापुस, तूर खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्यांनी घेतला आहे. जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणुला प्रतिबंध म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व गर्दीचे ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. शासकीय, खासगी आस्थापना बंद झाल्या आहेत. सध्या कापूस, तूर विक्री सुरु असल्याने त्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण आहे. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी जिल्ह्यातील कापूस, तूर खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी घेतला आहे. 31 मार्चपर्यंत खरेदी केंद्र बंद राहणार आहेत.




























































