
परळीत शनिवारी रात्री झालेल्या घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गुंडांनी शनिवारी रात्री जुन्या गाव भागात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये काही ऑटो रिक्षांचा समावेश आहे.या घटनेमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, परळी शहर व संभाजी नगर पोलीस ठाण्यात ऐकून बातमी देईपर्यंत 12 जणांनी आपल्या गाड्या फोडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
झाले असे शनिवारी मध्यरात्री गुंडांनी धुमाकूळ घालत जुन्या गाव भागातील चारचाकी, तीन चाकी गाड्या, रिक्षा यांना लक्ष करत त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. खंडोबा नगर, सावतामाळी परिसर, तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार, अंबेवेस आदी भागांत घरासमोर लावलेल्या गाड्यांची दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी रिक्षा, कार आदि वाहनांची नासधूस केली. यात सर्व गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. धक्कादायक म्हणजे त्यांना अडवणाऱ्या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले.
अगोदरच कोरोच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना त्यात असे संकट कोसळून त्यांचे यात नुकसान झाले आहे. या गुंडांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व घटनेत नुकसान झालेल्याना आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसान झालेल्या वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, ही यंत्रणा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याने याचाच फायदा घेत या गुंडांनी उचलला असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
पोलीस प्रशासनाने गुंडावर वचक ठेवण्याची गरज
परळीत संभाजीनगर पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे असतांना त्यांचा धाक समाजकंटकांवर नसल्याचे दिसून येते. रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे या वाढदिवसासाठी रात्रीबेरात्री फटाके वाजवणे, ऑटोत गाण्यांचे मोठे आवाज करणे. यासह रोडरोमियोच्या रस्त्यावरील वाहनांच्या अमर्यादित वेग अशा अनेक कारणामुळे परळीकर हैराण झालेले आहेत. या सर्व बाबी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने हाताळण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.


























































