
सामना प्रतिनिधी । परळी-वैजनाथ
परळी येथे शनिवारी रात्री ४ दरोडेखोर पकडल्यानंतर आज सोमवारी पहाटे पुन्हा एकदा चोर पोलिसांचा थरार पाहण्यास मिळाला. शर्थीच्या प्रयत्नानंतर एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सहा जणांपैकी एकाला परळीच्या बस स्टँड परिसरातून ताब्यात घेत ही कारवाई करण्यात आली आहे.
अंबाजोगाई येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची गाडी पहाटे ३ च्या सुमारास पोलिसांनी अडवली. पण गाडी न थांबवता त्यांनी तिथून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. घाटनांदुर मार्गावर पाठलाग करत रेल्वे फाटकावर इंडिका कार त्यांनी थांबवली. तेव्हा दरोडेखोरांनी पोलिसांच्या गाडीवर अंदाधुंद दगडफेक सुरू केली आणि ते तिथून फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान पोलिसांनी ती इंडिका गाडी जप्त केल्यानंतर ती देखील चोरीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या गाडीतही शस्त्र देखील सापडले.
त्यानंतर अंबाजोगाई पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. हे सहाही जण एका ऑटोतून परळी कडे गेले असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी पथक परळीकडे रवाना केले. सकाळी साडे पाचच्या दरम्यान परळी बस स्टँडवर हे दरोडेखोर असल्याची माहिती मिळताच पोलीस तेथे दाखल झाले. मात्र सहापैकी एकच दरोडेखोर त्यांच्या हाती लागला. हे दरोडेखोर परभणी येथील असून अंबाजोगाई येथे मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीने आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अन्य ५ जणांचा तपास घेतला जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्रीधर आणि अंबाजोगाईचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या पथकाच्या कारवाईमुळे दरोड्याचे अनेक डाव उधळले गेले आहेत.























































