
वादग्रस्त निलंबित सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घ्यायचा निर्णय पोलीस आयुक्त स्तरावरील निलंबन आढावा बैठकीत घेण्यात आला होता. तसेच सीआययूच्या प्रमुखपदी वाझेच्या नियुक्तीस गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांचा विरोध होता. मात्र तरी देखील तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी तोंडी आदेश देऊन वाझेची सीआययूमध्ये नियुक्ती केली होती. ‘अॅण्टेलिया’ स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर गृह विभागाने वाझे याच्याशी संबंधित अनेक बाबींची माहिती मागितली होती. त्यासाठी काही प्रश्नावली देण्यात आली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी आपला अहवाल सादर केला असून त्यात अनेक बाबींचा उलघडा झाला आहे.
गेल्या वर्षीच्या 5 जून रोजी पोलीस आयुक्त स्तरावरील निलंबन आढावा बैठकीत एपीआय सचिन वाझे याला सेवेत पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या बैठकीत तत्कालीन पोलीस आयुक्त, सहआयुक्त (प्रशासन), अपर पोलीस आयुक्त (स.पो.दल) व उपायुक्त (मंत्रालय सुरक्षा)हे अधिकारी उपस्थित होते. निलंबन काढल्यानंतर 8 जून रोजी वाझेची नियुक्ती सशस्त्र पोलीस दलात करण्यात आली होती. तर त्याच दिवशी पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत वाझेची नियुक्ती गुन्हे शाखेत करण्यात आली होती.
विरोध डावलला, दोन निरीक्षकांना हटवले
सीआययूच्या प्रभारी पदी निरीक्षक दर्जाचा अधिकारी असणे गरजेचे असताना परमबिर सिंह यांच्या तोंडी आदेशानुसार एपीआय असलेल्या वाझेकडे सीआययूची सूत्रे सोपविण्यात आली. वाझेची सीआययूमध्ये नियुक्ती करण्यासाठी तेथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विनय घोरपडे व सुधाकर देशमुख यांना हटविण्यात आले. वाझेच्या नियुक्तीला गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांचा कठोर विरोध होता. मात्र तरी देखील तत्कालीन आयुक्तांच्या आग्रहास्तव वाझेच्या नियुक्तीचा कार्यालयीन आदेश नाइलाजास्तव सहआयुक्तांना जारी करावा लागला होता, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वाझे रिपोर्टिंग फक्त आयुक्तांना करायचा
गुन्हे शाखेतील तपासी अधिकारी हा त्याच्या कक्ष प्रभारी अधिकाऱयाकडे तपासासंदर्भात प्रथम रिर्पाट करतो. त्यानंतर कक्ष अधिकारी हा तपासी अधिकारी याच्यासह सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त, सहआयुक्त यांना रिर्पाट करतात. गुन्हे शाखेची अशाप्रकारे कामाची पद्धत असतानाही वाझे ही पद्धत अवलंबत नव्हता. आपल्याकडील तपासाची रिपार्टिंग यापैकी कोणाही अधिकाऱयाकडे न करता तो थेट परमबिर सिंह यांच्याकडे परस्पर रिपोर्टिंग करत होता. त्यामुळे वाझे नेमके काय रिपोर्टिंग करायचा याबाबत अन्य अधिकारी अंधारात हेते, असेही अहवालात म्हटले आहे.
सरकारी गाडय़ा असतानाही आलिशान गाडय़ांचा वापर
सीआययू कक्षास कार्यालयीन वापरासाठी टाटा सुमो, इनोव्हा, स्कॉर्पिओ अशा तीन गाडय़ा आहेत. मात्र या गाडय़ांव्यतिरिक्त कार्यालयात ये-जा करण्यासाठी वाझे मर्सिडिज, ऑडी अशा आलिशान खासगी गाडय़ांचा वापर करीत होता, असे नमूद करण्यात आले आहे.
57 अधिकाऱयांचे निलंबन रद्द करून सेवेत घेतले
कोविड प्रादुर्भाव निमित्त मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण तीन आढावा बैठकी झाल्या होत्या. बैठकीदरम्यान एकूण 57 पोलीस अधिकारी/कर्मचाऱयांचे निलंबन रद्द करून त्यांना सेवेत घेण्यात आले होते, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
ऍण्टेलियाशेजारी स्फोटक ठेवण्याच्या कटात मनसुख हिरेनचाही सहभाग
‘अॅण्टेलिया’जवळ स्फोटकांची स्कॉर्पिओ कार पार्क करण्याच्या कटात मनसुख हिरेन हादेखील सहभागी होता. त्यामुळेच हिरेन यांना आपला जीव गमवावा लागला असा दावा एनआयएने बुधवारी विशेष कोर्टात केला. असे सर्व करण्यामागे मोठा आर्थिक हेतू असल्याची दाट शक्यता असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे एनआयएने कोर्टात सांगितले.