परभणी – 45 हजारांची हातभट्टी दारू नष्ट; महिलेवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली येथील शिवारातील एका अखाड्यावरील शेतात हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. यावरून पोलिसांनी सोमवारी सकाळी 11 वाजता या ठिकाणी छापा मारून 45 हजार रुपयांचे सडके रसायन नष्ट करून आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

या वेळी आखाड्यावर पोलिसांनी पाहणी केली असता तीन प्लॅस्टिक टाक्यांसह इतर कॅनमध्ये सडके रसायन भरून ठेवण्यात आले होते. त्याच बरोबर गुळाचे, नवसागरचे, बिब्याचे पाणी टाकूण भिजण्यासाठी घातलेले सडके रसायन होते. पोलिसांच्या पथकाने या सर्व टाक्या व कॅन त्याच शेतात सांडून नष्ट केल्या.

या प्रकरणी मुद्देमालासह आरोपी महिलेला मानवत पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक एच. जी. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमान कच्छवे, पोलिस हवालदार सखाराम टेकुळे, पोलिस हवालदार जगदीश रेड्डी, श्रीकांत घनसावंत, अतुल कांदे, महिला पोलिस कॉन्स्टेबल पूजा भोरगे, चालक गजेंद्र चव्हाण यांनी मिळून केली.