परभणी – बाईकवरील व्यापार्‍यावर हल्ला करून दोन लाखाची रोकड लांबवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकीवरून घराकडे निघालेल्या व्यापार्‍याच्या कानशिलात लगावून तीन चोरट्यांनी 1 लाख 95हजार 500 रुपये रक्कमेची बॅग पळविल्याची घटना मंगळवार, 2 फेबु्रवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास वकील कॉलनी परिसरात घडली. धावत्या गाडीवर हल्लाकरून घराजवळच व्यापार्‍याला लुटल्याच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुणाल अनिल यानपल्लेवार (30 वर्षे रा. देवळे जिनिंग परिसर, गंगाखेड) यांचे शहरातील वकील कॉलनीत सुपर शॉपी नावाचे दुकान आहे. मंगळवारी रात्री 9.30 वाजेदरम्यान दुकान बंद करून ते बॅगेत रोख 1 लाख 95 हजार 500 रुपये घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाले. घराजवळ आले असता त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या तीन चोरट्यांपैकी धावत्या गाडीवरून त्यांच्यावर हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने यानपल्लेवार दुचाकीवरून खाली पडले. लागलीच चोरट्यांनी रोख रक्कमेची बॅग हिसकावून घेत दुचाकीवरून फरार झाले. यानपल्लेवार यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले. मात्र, तोपर्यंत चोरटे नजरेआड झाले होते. याप्रकरणी कुणाल अनिल यानपल्लेवार यांनी मध्यरात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोउपनि विठ्ठल घोगरे हे करीत आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी सपोनि विकास कोकाटे, बालाजी गायकवाड, विठ्ठल घोगरे आदी अधिकारी व कर्मचार्‍यांना नाकाबंदीच्या सूचना दिल्या. मात्र, याचा काहीच फायदा झाला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद खोडवे, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरते कैद झाल्याचे आढळून आले आहे.