
#Mahaelection2019 ‘परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात महायुतीचेच पारडे जड असून विरोधी उमेदवारांची अवस्था फारशी चांगली दिसून येत नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यात महायुतीचेच उमेदवार खात्रीने निवडून येतील’, असा विश्वास शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आज येथे व्यक्त केला. वसमत रोडवरील शिवसेना खासदार संपर्क कार्यालयात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
संजय जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गंगाखेड, परभणी, पाथरी आणि जिंतूर या चारही विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांची स्थिती भक्कम असून राज्यात भगव्या विचाराचे सरकार आणण्यासाठी जनतेतूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा, परभणी आदी तालुक्यात आपला धावता प्रचारदौरा झाला असून जनमानसातून महायुतीच्या उमेदवाराबाबत कौल दिसून येत आहे. गंगाखेड विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार विशाल कदम हेच अधिकृत उमेदवार असून त्यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे. गंगाखेडची जागा महायुतीतून शिवसेनेला सुटली असल्यामुळे शिवसैनिकांची जागा सोडून घेण्याची अनेक वर्षापासूनची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह महायुतीतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकत्र्यांनी महायुतीच्या उमेदवारासाठी तन, मन, धनाने कामाला लागावे आणि विजयश्री खेचून आणावी, असे आवाहनही खासदार संजय जाधव यांनी यावेळी केले.




























































