
सामना प्रतिनिधी । परभणी
तब्बल तीन वर्षाच्या पाठपुराव्यानंतर परभणीकरांच्या सेवेसाठी नव्यानेच परभणी रेडिओ एफ.एम. ची सेवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच बुधवार, २३ जानेवारी रोजी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस रेडिओ केंद्राच्या नूतन संचालिका तथा साहित्यिक अर्चना डावरे, संभाजीनगरचे संचालक श्रीनिवास सोळंके यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, शिवसेना गटनेते चंद्रकांत शिंदे, नगरसेवक प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, नवनीत पाचपोर, गंगाप्रसाद आणेराव, प्रभू जैस्वाल, शेख साजेद, बाळराजे तळेकर, विश्वास कऱ्हाळे, संदीप झाडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अभय कुलकर्णी यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ.पाटील पुढे म्हणाले, परभणीची ओळख ही स्मार्टसीटी म्हणून व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून परभणी रेडिओ एफ.एम. ही संकल्पना साकारत आहे. यामुळे युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. परभणी येथे हाताला काम नसल्यामुळे अनेकजण स्थलांतर करत आहेत. याबद्दल खंत व्यक्त करत स्थलांतर रोखण्याच्या उद्देशाने परभणी रेडिओ, महिलांसाठी सुतगिरणी, तसेच छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरु करण्यावर भर देणार असल्याचे यावेळी सांगीतले.
मराठवाड्यातील संभाजीनगर येथे एम.एम.च्या धर्तीवर परभणी येथे ही सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. माहिती आणि तंत्रज्ञान युगात जनतेपर्यंत जाण्यासाठी हे माध्यम प्रभावी असून परभणी शहरापासून १० कि.मी. परिसरामध्ये एफ.एम.ची सेवा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना बाजारभाव, महिलांसाठी व्यक्तीमत्व विकासाचा कार्यक्रम, शेअरमार्केट, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मागदर्शन आणि त्याचबरोबर मनोरंजन याबाबी साध्य होणार आहेत. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे. त्याचबरोबर दर तासाला २ मिनीटांचे बातमीपत्र प्रसारित होणार आहे. ९०.८ एफ.एम.वर ‘आपली परभणी आपला आवाज’ थेट प्रसारण होणार असल्याची माहिती यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. यशस्वीतेसाठी युवासेनेचे तुषार चोरभारकर, मकरंद कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

































































