
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी- जिंतूर या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. तीने-चार दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रोडवर प्रचंड चिखल झाला आहे. शिवाय रस्ते निकृष्ट व अरुंद आहेत. त्यातच रस्त्यावर खड्डे असल्याने एकावेळी दोन वाहने प्रवास करू शकत नाहीत. या शिवाय परभणी-गंगाखेड रोड हा खड्डेमय बनला असून जागोजागी दोन ते तीन फूटांपर्यंत छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी अनेकवेळा किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून याबाबत प्रशासनाला निवेदने, अर्ज, विनंत्या करुन देखील याची दखल घेतली गेलेली नाही.
दोन वर्षांपासून रखडलेल्या परभणी-जिंतूर या राष्ट्रीय महामार्गाची एकही बाजू पूर्ण झालेली नाही. नुकत्याच झालेल्या पावसामुळे चिखल होवून वाहने रस्त्यात फसली व हा महामार्ग शनिवारी दुपारपासूनच वाहतुकीसाठी बंद झाला होता. तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अनेक वाहने घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सोमवारी एक शाळेची व्हॅन चिखलात फसल्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल दीड तास उशिरा शाळेत जावे लागले. परभणी- जिंतूर या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे तोडण्याचे काम अवघ्या काही दिवसांतच संबंधित कंत्राटदाराने केले. त्यानंतर महामार्गावरचे पुल तोडले आणि अचानक हे काम थांबविण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने काम बंद केल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने संभाजीनगर विभागीय आयुक्तांची भेट घेतल्यानंतर हे काम पुन्हा एक महिन्यापूर्वी सुरू झाले. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगण्यात आले.
जिंतूर ते बोरी हा रस्ता रहदारीचा चांगला असतानाही संबंधित कंत्राटदाराने या रस्त्यावर मातीचे ढिगारे आणून टाकले. नुकत्याच झालेल्या पावसात या रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यामुळे पांगरी पाटी ते जिंतूरपर्यंत अनेक वाहने या चिखलातच फसली. या वाहनांना चिखलातून काढण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूस शेकडो वाहने थांबल्याने आतील प्रवासी चिखलातून पायवाट काढत जात होते. त्यानंतर सहा तासांनी जेसीबी मशीनद्वारे अडकलेल्या वाहनांना काढण्यात आले. या सर्व प्रकाराला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा रस्ता दर्जेदार करून घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. जिंतूर ते बोरीपर्यंत रस्ता चांगला असतानाही काही दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने या रस्त्यावरील डांबर न काढताच काळीमाती मिश्रित मुरूम टाकला. झरी व परिसरातील दीड ते दोन हजार मुले परभणी येथे दररोज ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.






















































