
शक्तीपीठ महामार्ग जमीन अधिग्रहण करण्यासाठी सक्तीच्या मोजणी प्रक्रियेला परभणी जिल्ह्यातून मोठा विरोध होत आहे. परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा, आमडापूर आणि कोठाळा या गावातील शेतकरी सक्तीच्या मोजणीविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. जीव गेला तरी जमीन देणार नाही, आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापटही झाली. त्यामुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.
परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा, आमडापूर आणि कोठाळा या तीन गावाच्या परिसरात शुक्रवारी शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी केली जाणार आहे. या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे या महामार्गाला विरोध करणाऱ्या विविध पक्ष, संघटनांच्या सदस्यांना नोटीस देत काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. जीव गेला तरी आम्ही आमची जमीन आम्ही मोजू देणार नाही, असे म्हणत मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले.
शेतकऱ्यांनी थेट बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करत अधिकाऱ्यांना जमीन मोजणीला जाऊ देणार नाही असे म्हणत आंदोलन सुरू केले. मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला मोजणी करायची असल्याने तीनही ठिकाणी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला छावणीचे स्वरुप आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना रोखल्याने अनर्थ टळला. यावेळी महिला शेतकरी आणि महिला पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी महिला शेतकऱ्यांना अक्षरश: फरपटत नेले. याचे धक्कादायक व्हिडीओही समोर आले आहेत.
सतेज पाटील यांचा हल्लाबोल
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे शांतीपूर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलयं हे नक्की. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध, अशी पोस्ट काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले आहे.
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहजापूर (जवळा) या गावामध्ये रात्रीपासून शेतकऱ्यांना अटक, घरांवर नोटिसा, आंदोलकांना ताकदीच्या बळावर ताब्यात घेणे आणि महिला भगिनींना फरपटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलीसांमार्फत… pic.twitter.com/CYNNWIr4C0
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) February 20, 2026





























































