
सामना प्रतिनिधी। परभणी
शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे धाराशिव येथे उभारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने शासनाच्या या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी शिवसेना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ५२० खाटांची ओपीडी परभणीमध्ये आहे. लोकसंख्या-खाटांची संख्या, बाह्य रुग्णांची संख्या शस्त्रक्रीया यांची पूर्तता होत असल्याने परभणीत वैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे . मात्र परभणीला डावलून धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, परभणी येथेच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे.
परभणी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारे निकष परभणीत उपलब्ध आहेत. हिंगोली आणि जालना जिल्ह्यासाठी परभणी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच असंख्य रुग्णांच्या दृष्टीने परभणीत वैद्यकीय महाविद्यालय सोयीचे ठरणार आहे. शासनाकडून परभणीकरांवर जाणिवपूर्वक अन्याय केला जात आहे. परभणीकरांचा हक्क असताना धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता दिली आहे. शासनाच्या कृतीबद्दल नागरिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. परभणीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, याच मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयसमोर सोमवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्ह्राप्रमुख विशाल कदम यांनी केले आहे.































































