नियमांचा बडगा दाखवून ग्रामीण वाहनधारकांची लूट, शहरवाहतूक पोलिसांची अघोषीत वसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

एकीकडे जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानास थाटात प्रारंभ होत असतानाच दुसरीकडे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासामोरच वाहतूक नियमांचा बडगा दाखवत ग्रामीण वाहनधारकांची अक्षरश: आर्थिक लुट केली जात आहे. शहर वाहतूक पोलिसांच्या या भूमिकेबद्दल वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटत असून शहर पोलिसांची परभणी शहरात अघोषीत वसुली मोहिम तेजीत आली आहे. वाहन पार्किंग व्यवस्थेच्या नावाखाली दररोज गाडीभर वाहने जप्त केली जात असल्याने वाहनचालक शहर पोलिसांचा धसका घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परभणी शहरात कालबाह्य झालेली वाहने राजरोसपणे चालविले जातात. याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केल्याची बाब प्रकर्षाने जाणवत आहे.

परभणी शहराकडे ग्रामीण भागातील जनतेचा येणारा लोंढा टार्गेट केला जात आहे. परभणी शहराकडे ग्रामीण भागातून अनेकजण कामाच्या निमित्ताने येत असतात. येथून येणाऱ्या वाहनधाकरांना जाणिवपूर्वक वाहतूक नियमांचा बडगा दाखवत वाहनाची आडवणुक केली जाते. वाहतुकीचे नियम हे सर्वांंनाच सारखेच असताना केवळ ग्रामीण भागातील वाहनेच लक्ष्य केली जात आहेत. वास्तविक रस्ता सुरक्षा अभियानास नागरिकांना वाहतूक नियम समजावून सांगणे हे शहर पोलिसांचे आद्य कर्तव्य असताना त्याकडे लक्ष न देता, केवळ वसुलीसाठीच नियम तयार केलेले आहेत की काय? असे बोलके चित्र पहावयास मिळत आहे. शहर पोलीस वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवेजी पोलीस वसुलीवरच भर देत आहेत. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतुकीसंदर्भातले धडे शिकवणे हे काम रस्ता सुरक्षा काळात केले जात असतात. परंतु या कामास बगल देत केवळ ‘वसुली एके वसुली’ऐवढाचा कार्यक्रम राबविला जात असल्याने शहर पोलिसांच्या बाबत तीव्र नाराजी दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून परभणी बाजारापेठेतील वाहतूक विस्कळीत झाली आहेत. जागोजागी चौकांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत. शहरातील नारायण चाळ, विसावा कॉर्नर, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ, शनिवारबाजार आदी भागांमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्या ठिकाणी शहर पोलीसांची नेमणूक असताना त्या ठिकाणी शहर पोलीस कार्यरतच नसल्याचे चित्र पहावसाय मिळत आहे. शहरात कोठेही वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही. याकडे अनेकवेळा लक्ष वेधुनही त्याकडे दुर्लक्ष करत रस्त्यावरील वाहने एका ट्रकमध्ये भरली जातात आणि हा ट्रक शहर पोलिसांच्या कार्यालयात खाली करण्यात येतो. परभणी शहरात वाहन उचलणारा ट्रक दिसताच नागरिक आपली वाहने घेऊन दिसेल त्या दिशेने सैरा वैरा जात असताना दिसत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने उचलून वसुली वाढविण्याचा सपाटा शहर पोलिसांनी लावल्यामुळे वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

परभणी शहरात मोठ्या प्रमाणात कालबाह्य झालेले अ‍ॅटोरिक्षा वाहतूक चालते. जड वाहनांना प्रवेश दिल्याने वाहतूक कोंडी होते. या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. अनेक अ‍ॅटोरिक्षे पेट्रोल ऐवेजी रॉकेलवर चालतात. त्यामुळे वाहन प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे. याही प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे असताना केवळ वसुलीवरच शहर पोलीस लक्ष देऊन आहेत. शालेय विद्याथ्र्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता, त्यांना शहर वाहतुकीचे प्रशिक्षण देणे गरजेचे असताना असा कोणताही उपक्रम राबविला जात नाही. किमान रस्ता सुरक्षा अभियानकाळात तरी शहर पोलिसांनी काही नियम स्वत: पाळणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक सिग्नल धुळखात पडून आहेत. वाहतूक सिग्नल सुरु करणे गरजेचे असताना जागोजागी ‘रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता’अशा परिस्थितीत वाहतूक सिग्नल व्यवस्था बंद करण्यात आली. परभणी शहरात वाहने चालविण्यासाठी एकही रस्ता सुस्थितीत नाही आणि शहर वाहतूक पोलीस मात्र नियमांचा बडगा दाखवत लुट करत याबद्दल संताप व्यक्त होत आहे.