नव्या बसस्थानकाचे दिवाकर रावते यांच्या हस्ते भूमिपूजन

373

सामना प्रतिनिधी। परभणी

राज्यातील प्रत्येक नव्या बसस्थानकात आता वाताणुकूलीत चित्रपटगृहे उभारले जाणार असून राज्यभरात तब्बल 175 नव्या बसस्थानकाचे काम सुरू आहेत. कामे उत्तम दर्जाची झालीच पाहिजेत. कामगार कल्याणाच्या नव्या योजना राबवत परिवहन खात्याला नवी ओळख देण्याचा आपला मानस असून त्यानुसार सेवासुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज दिली.

शहराचे वैभव वाढविणारी तब्बल 13 कोटी रुपयांची नव्या बस डेपोच्या इमारतीचे आज परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या हस्ते आज सकाळी भूमिपूजन झाले. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या त्यांनी सर्वप्रथम शुभेच्छाही दिल्या. आता उद्यापासून या नव्या बसस्थानकाच्या कामास प्रारंभ होणार असून या नव्या बसस्थानकात वाताणुकूलीत व्यवस्थेबरोबरच वाताणुकूलीत चित्रपटगृहे सुद्धा उभारले जातील. अर्थात हे चित्रपट महामंडळातर्फे बांधले जाणार आहे. यासाठी खर्च वाढणार आहे. परभणी बसस्थानकाचा खर्च या चित्रपटगृहामुळे 15 कोटी पर्यंत जाईल. मराठी चित्रपट आणि मराठी कलावंतांना प्रात्साहन मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वच नव्या बसस्थानकात वाताणुकूलीत छोटी चित्रपटगृहे उभारले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

परिवहन महामंडळात 1 लाख 5 हजार कर्मचारी कार्यरत असून राज्यात अथवा देशात इतक मोठ महामंडळ कोणतही नाही. महाराष्ट्रात सध्या दोनशेपर्यंत नव्या बसस्थानकाची कामे सुरू आहेत. परभणीला नवे बसस्थानक नाही दिले तर माझे मंत्रीपद फुकट गेले, असे वाटू नये म्हणून परभणीच्या या नव्या बसस्थानकाच्या कामास सुरुवात केलेली आहे. मी जरा बारकाईने बघणारा माणूस आहे. कामाचा दर्जा उत्तम असायलाच हवा. जातीने लक्ष द्या. लोकप्रतिनिधी बरोबरच परिवहन खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही लक्ष घालावे. बसस्थानकात अवैध धंदे, बेवारस लोक, खड्डे आता हे चालणार नाही. कोणीही लोभात अडकू नये, असा स्पष्ट इशाराही दिवाकर रावते यांनी यावेळी दिला. त्यानंतर त्यांनी परिवहन खात्यातील अनेक कल्याणकारी योजनांबाबतही सविस्तर माहिती दिली. महिलांना यापुढे परिवहन खात्यात चालक या पदावर घेणार आहे. तसेच परिक्षेच्या माध्यमातून त्यांना वाहनचालकांना व वाहकांना लिपीक पदाची संधीही दिली जाणार आहे. प्रवासी अन्नदात आहे. त्यामुळे प्रवाशांची काळजी घ्या. कधी मागे-पुढे झालेच तर प्रवाशांना सांभाळून घ्या. पुरग्रस्तांसाठी सर्वप्रथम लालपरी धावून गेली. कोल्हापूर, सांगलीला जवानांना घेवून 10 एसटी बसेस पाठविण्यात आल्या. परिवहन खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी कर्मवीर भाऊराव शिष्यवृत्ती योजना राबविणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रतीमाह 750 रुपये त्यांना दिले जात आहेत. विकासासाठी मातीशी नाळ असावी लागते. हिम्मत, निर्धार आणि विकासाची संकल्पनाही अंगी असावी लागते, असेही दिवाकर रावते म्हणाले.

आपल्या प्रास्ताविकात शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अनेक विकास कामांना चालना दिली असल्याचे सांगीतले. रावते यांनी परभणीला खुप काही दिले आहे. त्याची यादी सांगीतल्यास दिवस पुरणार नाही. जय भवानी महिला सुतगिरणीसाठी 6 कोटी रुपयांचा निधी आणण्यात आला. पिंगळगड नाल्याचे काम पूर्णत्वास नेले आहे. उड्डानपुल, विद्यापीठातील उती संवर्धन प्रकल्प, मुलींसाठीचे अद्यावत वसतीगृह, राहटीचा बंधारा, 16 कोटी रुपयांचे नाट्यगृह असे अनेक विकासकामे रावते यांच्याशिवाय शक्यच नव्हती. त्यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असते, असेही ते म्हणाले. यावेळी महापौर मीनाताई वरपुडकर यांनी परभणीला नव्या बसस्थानकाची खुपच गरज होती. ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास होता. दिवाकर रावते यांनी परभणीच्या विकासासाठी आत्तापर्यंत खुप काही केले आहे. अजुनही त्यांनी करत रहावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी महापौर मीनाताई वरपुडकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, आमदार डॉ. राहुल पाटील, बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, मनपा आयुक्त रमेश पवार, उपविभागीय दंडाधिकारी सुचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह अनेक मान्यवंत उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या