
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे आणि परचुरी पुलावरील रेलिंग आणि दिव्याचे खांब पुराच्या पाण्यामुळे तुटले आहेत. दिव्याचे खांब कोसळून आणि रेलिंग तुटून दोन महिने उलटले तरी अद्याप दुरुस्ती झाली नसल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खाडीभागाला जोडणारा आणि परचुरी गावासाठी महत्त्वाचा असणारा म्हणून परचुरी पूल ओळखला जातो. पुरामधून होणारा धोकादायक होडी प्रवास बंद व्हावा म्हणून आमदार उदय सामंत यांच्याकडे परचुरीवासियांनी पुलाची मागणी केली होती. 32 वर्षांनंतर परचुरीवासियांची पुलाची मागणी पूर्ण झाली होती. त्यामुळे होडीचा धोकादायक प्रवास संपला होता. कोळंबे परचुरी पुलामुळे खाडी भागातील अनेक गावे महामार्गास जोडली गेली आहेत. तसेच गणपतीपुळे या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून अनेक पर्यटक या मार्गाचा उपयोग करतात.
या वर्षी आलेल्या पुरामुळे दोन वेळा हा पूल पुराच्या पाण्याखाली गेला होता. पुराच्या पाण्यामुळे आणि पाण्याच्या वेगामुळे पुलावर बसवण्यात आलेले दिव्याचे खांब वाकले आहेत. तसेच पुलाचे रेलिंगही तुटले आहे. पुलावरील दिव्याचे खांब वाकल्याने रात्रीच्या वेळी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले दिव्याचे खांब दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून करण्यात आली आहे.



























































