
सामना ऑनलाईन । मुंबई
पुढच्या पाच महिन्यात परळ टर्मिनसचे काम पूर्ण होऊन मार्च 2019 पासून या टर्मिनसमधून लोकल गाड्या सुटायला सुरुवात होईल अशी शक्यता आहे. परळ स्थानकाचं टर्मिनसमध्ये रुपांतर करण्यासाठी स्थानकात अतिरिक्त फलाटांची आणि रेल्वे ट्रॅकची गरज आहे, ज्यामुळे गाड्या परळ स्थानकातून सोडता येऊ शकतील. हे काम सध्या वेगाने सुरू असल्याचं मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी म्हटलं आहे.
परळ स्थानकाचं रुपांतर टर्मिनसमध्ये करण्यात यावं यासाठी 2012 साली प्रस्ताव मांडण्यात आला होता. परळ आणि प्रभादेवी स्थानकातील गर्दी गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. या परिसरात असलेल्या कार्यालयांची संख्या वाढल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवासी इथे मोठ्या संख्ये लोकल पकडतात आणि त्यातून उतरतात. दादर स्थानकाला टर्मिनस म्हणून काही मर्यादा आहेत, ज्यामुळे दादरऐवजी परळ इथे टर्मिनस सुरू केलं जावं अशी प्रस्तावामागची मूळ कल्पना होती.
परळ स्थानकामध्ये स्टेबलिंग लाईन्स म्हणजे रेल्वेचे अतिरिक्त ट्र्रॅक तयार करण्याचं काम करावं लागणार आहे. या ट्रॅकचा वापर लोकल गाड्यांचा गोंधळ झाल्यास परळ स्थानकातून लोकल ट्रेन अप दिशेला किंवा डाऊन दिशेला परत पाठवता येऊ शकेल. अशी व्यवस्था सध्या फक्त कुर्ला टर्मिनसमध्येच उपलब्ध आहे. कुर्ला स्थानकात गाड्या उलट दिशेने फिरवण्यासाठी रेल्वे रुळांचीही उपलब्धता आहे आणि अतिरिक्त फलाटांचीही उपलब्धता आहे. दादर स्थानकामध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे मात्र गाड्या उलट दिशेने फिरवण्यासाठी अतिरिक्त रुळ उपलब्ध नाहीत. शिवाय कुर्ला टर्मिनसमध्ये कारशेडही आहे ज्याचा वापर रिकाम्या लोकल ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. दादर आणि सीएसएमटी स्थानकादरम्यान काही बिघाड झाला तर गाड्या कुर्ल्यावरून परत फिरवाव्या लागतात. परळ टर्मिनस तयार झाल्यास त्याचा बराच फायदा होईल आणि गाड्या टर्मिसनमधूनच सीएसएमटी किंवा ठाणे, कल्याणच्या दिशेने उलट फिरवता येतील.
लोकल गाड्यांसाठीचं टर्मिनसचं काम पूर्ण झाल्यानंतर परळ स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या टर्मिनसच्या उभारणीचं काम सुरू होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. गाड्या सायडिंगला नेण्यासाठी तसेच गाड्यांची साफसफाई करण्यासाठी पिट एरिया देखील इथे तयार केला जाणार आहे. या टर्मिनसमुळे सीएसएमटी आणि दादर स्थानकावरील भार कमी होईल असं रेल्वे प्रशासनाला वाटतंय.
माहिती मध्य रेल्वेवरील परळ स्थानकात सुरु असलेले लोकल टर्मिनसचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे ठाणे आणि कल्याणला जाण्यासाठी परळ टर्मिनसवरुन लोकल गाड्या सुटणार आहेत. दादर स्टेशनवरील भार हलका करण्यासाठी लवकरच येत्या मार्च महिन्यापासून परळ टर्मिनसची सेवा सुरु होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली.





























































