
शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेत या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रकेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 4 जुलै रोजी बारामतीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी, किसन गंधाडे, डॉ. मुद्दसीर सय्यद या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राज्यात एकत्र सत्तेत असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीबाबत चुकीचा संदेश जाऊन आघाडीत तणाव असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली.
यानंतर नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यासंदर्भात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्याशी चर्चा केली. या सर्व नगरसेवकांनी बुधवारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार नीलेश लंके हे देखील उपस्थित होते. यानंतर या सर्व नगरसेवकांनी मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, महिला आघाडीप्रमुख उमाताई बोरूडे आदी उपस्थित होते.
पारनेरचा पाणीप्रश्न सुटणार; मातोश्रीवर न्याय मिळाला
काल रात्री आम्ही पारनेरहून मुंबईत आलो आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला मातोश्रीवर पाठवले. पक्ष बदलामागे पारनेरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हे कारण होते. आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली पाणी प्रश्न सुटणार असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, अशी माहिती नगरसेवक डॉ. मुद्दसीर सय्यद यांनी दिली.
अजितदादांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा मान राखला
‘अजित पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दाचा मान राखला आणि हे नगरसेवक शिवसेनेत परत आले,’ अशी प्रतिक्रिया मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे.























































