
पारनेर शहरातील सोबलेवाडी येथे कोरोना संशयीत असल्याची अफवा शुक्रवारी सायंकाळपासून पसरल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत सबंधिताची भेट घेऊन चौकशी केली. तपासणीअंती सबंधित व्यक्ती तंदुरुस्त असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सोबलेवाडी येथे एक जण कोरोना संशयीत असल्याची चर्चा शक्रुवारी दुपारपासून सुरू होती. एका जागरूक नागरीकाने त्यासंदर्भात तहसिल कार्यालयास माहिती कळविल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी शुक्रवारी रात्री सोबलेवाडीस भेट देत सबंधित व्यक्तीची तपासणी केली.
त्या व्य़क्तीत कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून नसून ती व्यक्ती ठणठणीत आहे. काही दिवसांपूर्वी ती व्यक्ती मुंबईहून परतल्याने कोरोना संशयित असल्याच्या वावडया उठविण्यात येत होत्या. प्रत्यक्षात सबंधित व्यक्ती अलिकडच्या काळात मुंबईला गेलेली नसून सोबलेवाडी येथेच वास्तव्यास असल्याचे डॉ. लाळगे यांनी सांगितले. सबंधित व्यक्तीच्या मालकाच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यामुळे ती व्यक्ती मालकाला भेटण्यासाठी गेल्याची अफवा सोबलेवाडीतील काही टवाळांनी उठविली होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे डॉ. लाळगे यांनी सांगितले.
तालुक्यातील वडझिरे येथे दुबईहून आलेल्या तरूणाला होम कॉरंटाईन केले असून त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसून त्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. निघोज येथील चार वर्षांच्या मुलीसह तिच्या आईला कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्यांना नगरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तपासणीचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नाही. ही तालुक्याच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे.






























































