
2003 साली गावदेवी येथे एका वृद्धेची हत्या केल्या प्रकरणात अटक झाल्यानंतर नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तो 2007 मध्ये एक महिन्याच्या संचित रजेवर बाहेर आला. तेव्हापासून पसार झालेल्या त्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने तब्बल 13 वर्षांनंतर शोधून काढले. त्याला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले.
राजेशकुमार द्विवेदी (37) असे या आरोपीचे नाव आहे. 2003 मध्ये त्याने गावदेवी येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची गळा चिरून हत्या केली होती. त्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना पत्नी व आईच्या आजारपणाचे कारण सांगत तो एक महिन्याच्या संचित रजेवर बाहेर आला, पण त्यानंतर तो बेपत्ता झाला. तेव्हापासून तो लपून राहत होता. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हे शाखा युनिट-2 त्याचा शोध घेत होते. दरम्यान, प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विंध्यनगर शहरात पाळत ठेवून राजेशकुमारच्या मुसक्या आवळल्या.




























































