परशुराम घाटात दरड कोसळू नये यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर घाटात सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यावर बांधकाम विभागाने प्रचंड भर दिला आहे. घाटात कोसळलेली दरड आजही हटविण्यात आलेली नसली तरी भविष्यात अशा प्रकारचा कोणताही धोका निर्माण होवू नये यासाठी परशुराम घाटात 6 मीटर उंचीची आणि सुमारे 500 मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्राध्यान्याने सुरु करण्यात आले आहे. मे अखेर या घाटाच्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लागावे यादृष्टीने प्रयत्न सुरू असून यासाठी परशुराम घाट काही दिवस वाहतुकीसाठी बंद करून महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचा दृष्टीने विचार केला जात असल्याची माहिती महामार्ग बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत येणारे कशेडी , भोस्ते, परशुराम आणि कामथे हे चार घाट अतिशय अवघड आणि धोकादायक मानले जातात. एका बाजूला खोल दरी आणि नागमोडी वळणे यामुळे या घाटांमध्ये वारंवार भीषण अपघात होत आले आहेत. या चारही घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

22 जुलै 2021 रोजी कोकणात झालेल्या अतिवृष्टीदरम्यान कमकुवत झालेल्या परशुराम घाटाचा काही भाग कोसळला आणि हा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आणि घाटाचे चौपदरीकरण होणे किती गरजचे आहे हे प्रशासनाच्या लक्षात आले. दरम्यान घाटाचे काम सुरु व्हावे यासाठी चिपळूण येथील एक वकील ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने पोलीस बंदोबस्त घेऊन घाटाचे काम सुरु करण्याचे आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानुसार परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु करण्यात आले. मात्र काम सुरु करताना आवश्यक त्या उपाययोजना न केल्याने या ठिकाणी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आणि यामध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा नाहक बळी गेला. या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या महामार्ग बांधकाम विभागाने घाटात खोदाईचे काम करताना काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार डोंगर कापताना डोंगरावरील माती पुन्हा खाली येऊ नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून डोंगराच्या बाजूने सुमारे 6 मीटर उंच आणि 500 मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली असून हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घाटात कोसळलेली दरड अद्याप हटविण्यात आलेली नाही मात्र येत्या काही दिवसात ही दरड हटवली जाणार आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम विनाअडथळा करण्यासाठी किमान दीड महिना हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार असून या दरम्यान महामार्गावरील वाहतूक चिरणी, कळंबस्ते मार्गे वळविण्याचा विचार केला जात आहे. मात्र हा मार्ग अरुंद आणि खड्डेमय असल्याने परशुराम घाट वाहतुकीस बंद करण्याआधी चिरणी -कळंबस्ते मार्गाची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.