
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ पाहता त्यांचे चार सदस्य राज्यसभेत निवडून जाणार असून, उमेदवारीसाठी भाजपमध्ये खलबते सुरू झाली आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत.
भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार उतरवले जाणार आहेत. यापैकी एका जागेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे नाव जवळपास निश्चित आहे. विद्यमान राज्यसभा सदस्य धैर्यशील पाटील यांना फारच कमी अवधी मिळाल्याने त्यांना पुन्हा एकदा पक्षाकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. उर्वरीत दोन जागांसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून त्यासाठी विनोद तावडे, सुनील देवधर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, विनय सहस्रबुद्धे, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांची नावे शर्यतीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मंगळवारी रात्री होणाऱया भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
महाराष्ट्रातून सात खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन, शिवसेना एक, कॉँग्रेस एक, तर सत्ताधारी भाजपच्या कोटय़ातील तीन जागांचा समावेश आहे. विधानसभेतील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडील एकंदर पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटात रस्सीखेच
शिंदे गटाचा एक उमेदवार राज्यसभा निवडणुकीत विजयी होईल. उमेदवारी मिळावी यासाठी माजी खासदार राहुल शेवाळे, गजानन कीर्तिकर, संजय निरुपम यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
मविआकडून कुणाला संधी
महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱया शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे विधानसभेतील एकंदर संख्याबळ पाहता एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाईल. शरद पवार यांच्या नावाची चर्चा यासाठी आहे. मात्र, तिन्ही पक्षांची एकत्र बैठक अद्याप झालेली नाही. यामुळे मविआकडून कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

































































