परतवारी निमित्त नर्सीत हजारो भाविकांची मांदियाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। हिंगोली

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे परतवारी एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविकांची मांदियाळी बुधवारी एकत्र आली होती. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, संत नामदेव महाराज की जय…, ज्ञानोबा माऊली… तुकोबा माऊली, असा जयघोष करत दिवसभरामध्ये तब्बल सव्वा लाखाहून अधिक भाविकांनी नर्सी येथील नामदेव मंदिर व विठ्ठल-रुख्मीणी मंदिरात दर्शन घेतले.

पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी गेलेल्या वारकऱ्यांमध्ये नर्सी येथील परतवारीचे मोठे महत्व आहे. आषाढी एकादशीच्या नंतर येणाऱ्या या एकादशीला नर्सी येथे पंढरपुरचा विठोबा येत असल्याची अख्यायिका वारकरी संप्रदायात आहे. महाराष्ट्र व उत्तर भारतात भागवत धर्माची पताका फडकवुन प्रसार व प्रचार करणारे संत नामदेव यांचे जन्मस्थान हिंगोली तालुक्यातील नर्सी आहे. बुधवारी सकाळी येथे महापुजा करण्यात आली. दिवसभरामध्ये भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र नर्सीच्या चहुबाजुंनी दिसुन आले. पंढरपुरहुन गावाकडे परत आल्यानंतर या परतवारीला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. परतवारीच्या निमित्ताने नर्सीत जत्रेचे स्वरुप आले होते. पुजा साहित्याची दुकाने, खेळणीची दुकाने, अबीर, गुलाल, बुक्का, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटली होती. महिला भाविकांनी फुगडीवर ठेका धरत विठुरायाचा आणि संतांचा जयघोष केला.

सर्वत्र डौलाने फडकणाऱ्या या भगव्या पताका सर्वांचेच लक्ष वेधुन घेत होत्या. मंदिर समिती आणि विविध सामाजिक संघटनांकडुन भाविकांना महाप्रसाद, फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेचे माजी कृऊबा सभापती रामेश्वर शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून संत नामदेव मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आले आहे. हजारो भाविकांनी मंदिर जिर्णोध्दाराचे काम पाहुन समाधान व्यक्त केले. तसेच अनेक दानशुर भाविकांनी जिर्णोध्दारासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.

summary …paratwari celeberation at hingoli