देशात रासपा पक्ष सतरा राज्यात वाढला : महादेव जानकर

411

देशातील सतरा राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी वाढले आहेत. गुजरात राज्यात नगराध्यक्ष रासपाचा असून कळमनुरी मतदारसंघ रासपाला सोडण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाची बैठक हिंगोली येथील महावीर भवन येथे घेण्यात आली. यावेळी जानकर यांनी ही मागणी केली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत 25 ऑगस्ट रोजी महामेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली येथे रासपाची बैठक घेण्यात आली. यावेळी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर म्हणाले की, आदिवासी समाजाच्या ताटातील अर्धी भाकर धनगर समाज घेणार नाही. मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी महत्वाची भुमिकाही आम्ही बजावल्याचे जानकर यांनी सांगितले. आमच्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी मुंबई येथे महामेळावा घेण्यात आला असून या मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जानकर यांनी केले. याप्रसंगी शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जोडतळे, विनायक भिसे, पंढरीनाथ ढाले, नंदाबाई शिरफुले, वैजनाथ पावडे, पप्पू चव्हाण आदींची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या