
पश्चिम बंगालच्या खाडीत तयार झालेल्या बुलबुल चक्रीवादळाची पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशला रविवारी रात्री धडक दिली. यात 7 जणांचा मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची 35 पथके तैनात करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्याचबरोबर पश्चिम बंगालला सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, बुलबुल बांगलादेशच्या दिशेने सरकले आहे.
बुलबुल चक्रीवादळ ताशी 110 ते 120 वेगाने पश्चिम बंगाल, ओदिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर आदळले. मात्र, धडकल्यानंतर त्याचा वेग कमी झाला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, कोलकाताच्या सुभाषचंद्र बोस विमानतळ काल संध्याकाळपासून काही तासांसाठी उड्डाणे बंद करण्यात आली होती. बांगलादेशमध्ये वादळामुळे भोला, बारगुना आणि पटुआमध्ये 150 मच्छीमार बेपत्ता झाले आहेत तर 15 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, पुढील 6 तासांत बंगालच्या किनाऱयालगतच्या जिल्हय़ात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.


























































