
विमान प्रवासात ‘दम मारो दम’ करणाऱ्या प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. जहागीर सिद्धिकी मलिक असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयीन कोठडी देऊन मग जामिनावर सुटका केली.
जहागीर हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवाशी आहे. तो कामानिमित्त आखाती देशात गेला होता. सोमवारी तो रियाध येथून विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत होता. विमान प्रवासात जहागीरला सिगारेटची तलफ लागली. विमानातील शौचालयात जाऊन तो ‘दम मारो दम’ करू लागला. हा प्रकार विमानातील केबिन क्रूच्या लक्षात आला.
विमानात सिगारेट ओढल्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. केबिन क्रूने याची माहिती विमानतळ प्राधिकरणाला दिली. जहागीर हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यावर त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानाने ताब्यात घेतले. जहागीरला कारवाईसाठी सहार पोलीस ठाण्यात नेले. विमानात सिगारेट ओढल्या प्रकरणी जहागीरविरोधात एअर क्राफ्ट कायद्यानुसार सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
यापूर्वीच्या घटना
– चार वर्षांपूर्वी मुंबई-कोलकाता विमान प्रवासात ‘दम मारो दम’ करणाऱया दोघांना सहार पोलिसांनी अटक केली होती.
– चार वर्षांपूर्वी विमानात दम मारणाऱ्या जेरॉम जस्सी या प्रवाशाविरोधातदेखील कारवाई केली होती.
– 2019मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गोवा येथे जाणाऱ्या प्रवाशानेदेखील विमान प्रवासात सिगारेटचे झुरके मारल्याने त्या प्रवाशाला गोवा पोलिसांनी अटक केली होती.


























































