
वाराणसीहून मुंबईला जाणाऱ्या अकासा एअरच्या विमानात एका प्रवाशाने टेकऑफपूर्वी विमानाचा आपत्कालीन एक्झिट उघडण्याचा प्रयत्न केला. या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. सुजित सिंग असे ताब्यात घेतलेल्या प्रवाशाचे नाव असून तो जौनपूर जिल्ह्यातील गौरा बादशाहपूरचा रहिवासी आहे. सुजितच्या या कृत्यामुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर एक तासानंतर विमान मुंबईला रवाना झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकासा एअरचे QP1497 हे विमान सोमवारी संध्याकाळी 6.45 वाजता वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाणार होते. विमान धावपट्टीकडे येत असतानाच सुजित सिंग या प्रवाशाने आपत्कालीन एक्झिट उघडण्याचा प्रयत्न केला. केबिन क्रूकडून अलर्ट मिळाल्यानंतर पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला माहिती दिली आणि विमान परत एप्रनवर आणले.
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवले आणि सुजित सिंगला चौकशीसाठी ताब्यात घेतले. विमानातील अन्य प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार सुजित सिंगने कुतूहलापोटी एक्झिट उघडण्याचा प्रयत्न केला, असे फूलपूर स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) प्रवीण कुमार सिंग यांनी सांगितले. सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर वाराणसीहून विमान सायंकाळी 7.45 वाजता मुंबईला रवाना झाले.
            
		





































    
    




















