रेल्वे स्थानकावरील वाय-फायसाठी प्रवाशांना आता पैसे मोजावे लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेवर प्रवाशांना आधी मोफत वाय-फाय सेवा पुरविणाऱया रेल्वेने आता प्रवाशांना नेटचे विविध पॅक विकण्याची घोषणा केली आहे. देशभरातील चार हजारांहून अधिक रेल्वे स्थानकांवर ‘रेलटेल’ कंपनी आपले नेट पॅक प्रवाशांना विकणार आहे. सुरुवातीला अर्धा तास मोफत इंटरनेट पुरविल्यानंतर आता रेल्वे प्रवाशांकडून सेवा पुढे चालू ठेवण्यासाठी त्याचे पैसे आकारणार आहे.

रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय पुरविण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली होती. देशभरातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना त्यामुळे मोफत इंटरनेट सेवा मिळत होती. देशात सध्या 5950 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्यात आली आहे. रेल्वेच्या रेलटेल कंपनीने देशभरातील 4000 रेल्वे स्थानकांवर प्रिपेड वाय-फाय प्लान जाहीर केला आहे.

असे विकत घ्या

रेल्वे प्रवाशांना 1 एमबीपीएस गतीने प्रति दिन 30 मिनिटे मोफत इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्यानंतर मात्र सेवा सुरू ठेवण्यासाठी 34 एमबीपीएस उच्च गतीच्या इंटरनेटसाठी प्रवाशांना विविध पॅक विकत घ्यावे लागेल. ऑनलाइन नेटपॅक विकत घेण्यासाठी प्रवाशांना नेट बँकिंग, वॉलेट, क्रेडिट कार्ड असे पर्याय वापरता येणार आहेत. नव्या सशुल्क वाय-फाय सेवेमुळे कंपनीला वार्षिक 10 ते 15 कोटी रुपयांचा महसूल मिळेल असे रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी म्हटले आहे.

प्रिपेड वाय–फायचे दर

 5 जीबी प्रति दिन – 10 रुपये, 10 जीबी प्रति दिन – 15 रुपये, 10 जीबी पाच दिवस – 20 रुपये,  20 जीबी पाच दिवस – 30 रुपये,  20 जीबी दहा दिवस – 40 रुपये,  30 जीबी दहा दिवस – 50 रुपये, 60 जीबी तीस दिवस – 70 रुपये