
सामना ऑनलाईन । पुणे
पुणे- मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन म्हणजे हजारो प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा व अविभाज्य घटक बनला आहे. या गाडीने प्रवास करणारे प्रवासी रेल्वेच्या वाढदिवसासह अनेक वेगवेगळे उपक्रम राबवतात. त्यात आणखी एका अनोख्या उपक्रमाची भर पडली आहे. तो म्हणजे डेक्कन क्वीनमध्ये होणारी सर्वधर्मीय सामूहिक आरती. आपला प्रवास निर्विघ्नपणे आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रवासी नित्यनेमाने श्रींची आरती म्हणतात.
पुणे स्थानकातून डेक्कन क्वीन सुटल्यावर रोज सकाळी या आरतीला सुरुवात होते. एखाद्या कुटुंबाप्रमाणे सर्व प्रवासी आरतीला उभे राततात. पासधारकांच्या दोन डब्यांमध्ये ही आरती केली जाते. त्यासाठी कुणालाही सूचना किंवा जबरदस्ती केली जात नाही. अगदी भक्तिभावाने आणि खेळीमेळीत आरतीचा कार्यक्रम नित्य नियमाने केला जातो, त्यामुळे आनंदात प्रवास होत असून, प्रवासाचा थकवाही जाणवत नाही असे या गाडीतील प्रवासी सांगतात.

























































