तिन्ही रेल्वे मार्गांवर प्रवाशांचे हाल

उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. पश्चिम रेल्वेने देखभाल-दुरुस्तीसाठी शनिवारी दुपारपासून ब्लॉक घेतला होता. या ब्लॉक अवधीत रविवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तब्बल 85 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग कार्यालय हटवण्यासाठी 5 व्या लाईनवर तसेच यार्ड मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता. मध्य रेल्वेवरही प्रवाशांचे हाल झाले. मेन लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान तसेच हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाउन मार्गावर ब्लॉक घेतला होता. याचा लोकलच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम झाला.